Why Alcohol Ban in Saudi Arabia : सौदी अरब हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे दारूवर पूर्ण बंदी आहे. सामान्य नागरिकांसाठी दारूचा एक थेंब पिणंही गुन्हा मानलं जातं. पण आपल्याला हे माहिती नसेल की, ही बंदी केवळ इस्लामिक नियमांमुळे नाही, तर ७३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक राजकीय घटनेमुळे लागू करण्यात आली होती. तेव्हा असं काय घडलं होतं की, पूर्ण देशात दारूच बंद करण्यात आली. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
दारूबंदी का लागू झाली?
१९५२ च्या जानेवारीमध्ये सौदी अरबचे संस्थापक राजा अब्दुलअजीज यांनी दारूच्या आयात, विक्री आणि सेवनावर पूर्ण बंदी घातली. यामागचं मुख्य कारण म्हणजे १९५१ मध्ये घडलेली एक गंभीर घटना, ज्यात राजघराण्यातील एका सदस्याने नशेत एका ब्रिटिश मुत्सद्द्याची हत्या केली होती. या घटनेनंतर देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलीन झाली आणि अखेर दारूबंदीचा कठोर निर्णय घेण्यात आला.
नेमकं काय घडलं होतं?
१९५१ साली साली जेद्दामध्ये ब्रिटिश व्हाइस-कॉन्सुल सिरिल ओसमान यांच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या पार्टीत राजा अब्दुलअजीज यांचे पुत्र प्रिन्स मिशारी बिन अब्दुलअजीज हे नशेत होते. जेव्हा ओसमान यांनी त्यांना आणखी दारू देण्यास नकार दिला, तेव्हा रागाच्या भरात प्रिन्स मिशारी यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. या घटनेत सिरिल ओसमान यांचा मृत्यू झाला.
ही घटना सौदी राजघराण्यासाठी अत्यंत लाजिरवाणी ठरली. ब्रिटिश सरकारने तीव्र निषेध नोंदवला आणि राजा अब्दुलअजीज यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान सहन करावा लागला. यानंतरच त्यांनी निर्णय घेतला की देशात दारूला मुळापासून बंदी घालावी. १९५२ पासून सौदी अरबमध्ये दारूची आयात, विक्री, साठवण आणि सेवन हे गुन्हे ठरले.
दारू पिल्यास काय शिक्षा होते?
सौदी नागरिकांना दारू पिताना पकडल्यास १०० फटके आणि कारावास होऊ शकतो. तर परदेशी नागरिकांची देशातून हकालपट्टी होऊ शकते. पूर्वी ही बंदी केवळ धार्मिक कारणांवर आधारित होती. इस्लाममध्ये दारू हराम मानली जाते आणि कुराणमध्ये नशेपासून दूर राहण्याचा आदेश आहे. मात्र १९५२ पूर्वी डिप्लोमॅटिक कंपाउंड्स आणि परदेशी तेल कामगारांमध्ये मर्यादित स्वरूपात दारू उपलब्ध होती. १९५१ च्या घटनेनंतर मात्र पूर्ण आणि कठोर बंदी लागू करण्यात आली.
आजही बंदी कायम आहे का?
आज Vision २०३० अंतर्गत क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या आहेत. महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार, सिनेमागृहे, पर्यटनाला प्रोत्साहन याला प्राधान्य दिलं जात आहे. अलीकडेच नॉन-मुस्लिम मुत्सद्द्यांसाठी म्हणजे वेगळ्या देशातील दूतावासासंबंधी डिप्लोमॅटिक क्वार्टरमध्ये मर्यादित स्वरूपात दारू विक्रीसाठी दुकान उघडण्यात आलं आहे. तसेच एक्सपो २०३० आणि २०३४ फिफा वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्रात काही सवलतींची चर्चा सुरू आहे.
Web Summary : Saudi Arabia's alcohol ban, enforced since 1952, stems from a royal scandal. A prince, under the influence, murdered a British diplomat. This incident led to a strict nationwide prohibition on alcohol, impacting both citizens and foreigners.
Web Summary : सऊदी अरब में शराब पर प्रतिबंध 1952 से लागू है, जिसका कारण शाही घराने का एक कांड है। नशे में धुत एक राजकुमार ने एक ब्रिटिश राजनयिक की हत्या कर दी। इस घटना के बाद देश में शराब पर सख्त प्रतिबंध लगा दिया गया।