'रेड कार्पेट' वरच का केलं जास्त एखाद्या खास व्यक्तीचं स्वागत? निळ्या, पिवळ्या रंगाचा का नसतं कार्पेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:38 IST2025-11-05T13:41:36+5:302025-11-05T14:38:27+5:30
Red Carpet History : तुम्ही कधी विचार केला आहे का की, स्वागतासाठी नेहमीच “लाल” रंगाचाच गालिचा का वापरला जातो? तेच आज आपण समजून घेणार आहोत.

'रेड कार्पेट' वरच का केलं जास्त एखाद्या खास व्यक्तीचं स्वागत? निळ्या, पिवळ्या रंगाचा का नसतं कार्पेट
Red Carpet History : कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीचं, नेत्यांचं, किंवा सेलिब्रिटींचं स्वागत असो, किंवा एखाद्या खास समारंभात मान्यवरांचं स्वागत करायचं असो, आपण हमखास पाहतो की जमिनीवर रेड कार्पेट म्हणजेच लाल रंगाचा गालिचा अंथरलेला असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, स्वागतासाठी नेहमीच “लाल” रंगाचाच गालिचा का वापरला जातो? तेच आज आपण समजून घेणार आहोत.
लाल गालिच्याचा इतिहास
स्वागतासाठी वापरल्या जाणाऱ्या रेड कार्पेटचा इतिहास खूप जुना आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, याचा पहिला उल्लेख इ.स.पूर्व ४५८ मध्ये लिहिलेल्या प्राचीन ग्रीक नाटकात सापडतो. त्या नाटकातील राजा अॅगोमेमन जेव्हा ट्रोजन युद्धातून परततो, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरला जातो.
त्या काळात लाल रंग हा शाही सन्मान आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जात होता. प्राचीन ग्रीक आणि रोमन सभ्यतेत राजे-महाराजे आणि उच्चवर्गीय व्यक्तींसाठी लाल गालिचा वापरायची परंपरा होती.
जगभर प्रसार
काळ जसजसा पुढे गेला, तसतसा हा सन्मानाचा लाल गालिचा इतर देशांमध्ये पोहोचला. १८२१ मध्ये अमेरिकेत पहिल्यांदाच अधिकृतरीत्या याचा वापर झाला. तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरला गेला होता. १९२० च्या दशकात, हॉलीवूडमधील फिल्म आणि फॅशन इव्हेंट्समध्ये रेड कार्पेटचा वापर सुरु झाला जो आजही प्रतिष्ठेचं प्रतीक आहे.
लाल रंग आणि ऐश्वर्य
तुम्ही सोन्याचे दागिने घेतले असतील, तर तुम्ही पाहिलं असेल की सोनार ज्या डब्यात अंगठी, साखळी किंवा मंगळसूत्र देतो, त्याच्या आत लाल रंगाचं कापड असतं.
कारणं
- लाल रंग हा ऐश्वर्य, संपत्ती आणि सन्मानाचं प्रतीक मानला जातो.
- राजे-महाराजे आपले खजिने आणि मौल्यवान वस्तू लाल रंगाच्या कपड्यातच ठेवत असत.
- आजही “लाल पोटली” म्हणजे आत काहीतरी मौल्यवान वस्तू आहे, असं सूचित करतं.
भारतातील रेड कार्पेटचा इतिहास
भारतात पहिल्यांदा १९११ साली दिल्ली दरबारात रेड कार्पेटचा वापर झाला होता. त्या वेळी तत्कालीन वायसरॉय लॉर्ड हार्डिंगे यांनी इंग्लंडच्या किंग जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरला होता. हा कार्यक्रम लाल किल्ल्यात झाला होता.
आजचा ट्रेंड
आज रेड कार्पेट ही एक जागतिक परंपरा बनली आहे. जेव्हा कोणताही देशप्रमुख, सेलिब्रिटी किंवा मान्यवर दुसऱ्या देशात पोहोचतो. तो विमान किंवा गाडीतून उतरल्यावर सर्वप्रथम रेड कार्पेटवरच चालतो, कारण हा गालिचा आदर, प्रतिष्ठा आणि सन्मानाचा प्रतीक मानला जातो.