भारतामध्ये मोबाईल नंबर १० अंकीच का असतो? जाणून घ्या यामागचं गणित आणि कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:09 IST2025-10-15T17:07:56+5:302025-10-15T17:09:41+5:30
Interesting Facts : भारतात मोबाईल नंबर 10 अंकांचेच का असतात? आपल्यालाही माहीत नसेल कारण...

भारतामध्ये मोबाईल नंबर १० अंकीच का असतो? जाणून घ्या यामागचं गणित आणि कारण
Interesting Facts : आपण दररोज मोबाईल नंबर डायल करतो, पण कधी विचार केला आहे का की भारतात मोबाईल नंबर १० अंकांचेच का असतात? जर या नंबरमध्ये एखादा अंक कमी-जास्त झाला, तर तो नंबर लागत नाही. मग प्रश्न येतो की, जर मोबाईल नंबर ८, ९ किंवा ११ अंकी असते, तर नेमकं काय बिघडलं असतं? चला जाणून घेऊया या मागचं गणित आणि कारण.
१० अंकी मोबाईल नंबरचे गणित
प्रत्येक देश आपली लोकसंख्या आणि नेटवर्कची गरज पाहून फोन नंबरची रचना ठरवतो. १० अंकी नंबर सिस्टिममध्ये एकूण १० अब्ज (१०,०००,०००,०००) वेगवेगळे नंबर तयार होऊ शकतात. ही संख्या भारतासारख्या भक्कम लोकसंख्या असलेल्या देशासाठी पुरेशी आहे. जर नंबर ९ अंकी असता, तर फक्त १०० कोटी नंबर तयार झाले असते. जे भारतासाठी अपुरे आहेत. तर ११ अंकी नंबरमध्ये १०० अब्ज शक्यता असतात, जे खूपच जास्त आहेत आणि डायल करतानाही वेळखाऊ ठरले असते. म्हणूनच, १० अंकांचा नंबर हा संतुलित आणि व्यवहार्य पर्याय ठरला.
या १० अंकांचा अर्थ काय असतो?
मोबाईल नंबर केवळ तुमची ओळख नसून तो एक नेटवर्क अॅड्रेस सुद्धा असतो. तो टेलिकॉम नेटवर्कला सांगतो की कॉल कुठल्या क्षेत्रात आणि कुठल्या कंपनीकडे रूट करायचा आहे. पहिले ४ किंवा ५ अंक हे टेलिकॉम ऑपरेटर आणि सर्कल ओळखण्यासाठी असतात. उरलेले बाकिचे ५ किंवा ६ अंक हे ग्राहकाचा वेगळा, यूनिक नंबर असतो.
भारतात सुरुवातीपासून १० अंकी नंबर होते का?
नाही! १९९० च्या दशकात फोन नंबर ६ किंवा ७ अंकी असायचे. २००० नंतर मोबाईल क्रांतीमुळे ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे जुन्या नंबर सिस्टिममध्ये नवीन ग्राहकांना नंबर देणं अवघड झालं. म्हणूनच TRAI ने २००३ च्या सुमारास १० अंकी मोबाईल नंबर सिस्टिम देशभर लागू केली.