Toothpaste च्या ट्यूबवर जे कलर कोड्स असतात त्यांचा नेमका अर्थ काय असते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 17:47 IST2021-09-06T17:43:39+5:302021-09-06T17:47:31+5:30
हे कलर कोड लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाचे असतात. काही लोकांना वाटतं की, हे कलर कोड टूथपेस्टमधील साहित्याबाबत सांगतात.

Toothpaste च्या ट्यूबवर जे कलर कोड्स असतात त्यांचा नेमका अर्थ काय असते?
सोशल मीडियावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण काही प्रश्नांच्या उत्तरांबाबत कन्फ्यूजनही असतं. असाच एक प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात असतो. हा प्रश्न आपल्या सर्वांच्या घरात वापरल्या जाणाऱ्या टूथपेस्टशी संबंधित आहे. तुम्ही अनेकदा नोटीस केलं असेल की, टूथपेस्टच्या ट्यूबच्या शेवटी काही कलर कोड्स असतात. हे कलर कोड लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाचे असतात. काही लोकांना वाटतं की, हे कलर कोड टूथपेस्टमधील साहित्याबाबत सांगतात. पण सत्य तर वेगळंच आहे.
काय आहे गैरसमज?
बऱ्याच लोकांना असं वाटतं की, टूथपेस्टच्या ट्यूबवर जे कलर कोड असतात ते टूथपेस्ट तयार करण्यासाठी वापरलेल्या साहित्यासंबंधी असतात. हीच धारणा वेगवेगळ्या फूड पॅकेट्ससाठीही असते. लोकांना वाटतं की हिरव्या रंगाच अर्थ टूथपेस्ट नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलं आहे.
निळ्या रंगाचा अर्थ नैसर्गिक पदार्थ आणि औषधं. लाल रंगाचा अर्थ मिश्रित (नैसर्गिक आणि केमिकल) आणि काळ्या रंगाचा अर्थ टूथपेस्ट केवळ केमिकल पदार्थांपासून तयार केलं आहे. पण हा समज चुकीचा आहे.
का असतात हे कलर बॉक्स?
टूथपेस्ट बनवणारी कंपनी कोलगेटनुसार, या कलर कोड्सचा संबंध टूथपेस्टमधील पदार्थांशी नाही तर पॅकेजिंगशी आहे. हे कलर कोड्स लेजर लाइट सेंसरला हे सांगतात की, इथून पॅकेजिंगला कापायचं आहे किंवा वेगळं करायचं आहे. अशाप्रकारे मशीन पेस्टचं पॅकेजिंग तेथून कापून सहजपणे सील-पॅक करते.
म्हणजे या कलर कोड्सचा टूथपेस्टमधील पदार्थांशी काहीही संबंध नसतो. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की टूथपेस्ट कोणकोणत्या पदार्थांपासून तयार केलं आहे तर याच्या पॅकवर बघा आणि वाचा. त्यावर टूथपेस्टमधील पदार्थांची यादी दिलेली असते.