(Image Credit : www.popularmechanics.com)
आतापर्यंत तुम्ही वीटा, दगड, माती, सिमेंटपासून घरे तयार करताना पाहिलं असेल. पण कधी तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल्सपासून घर तयार केलं गेल्याचं ऐकलंय किंवा पाहिलंय का? पण कॅनडामध्ये असंच काहीसं करण्यात आलं आहे. हे घर सध्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. इथे साधारण ६ लाख प्लास्टिकच्या बॉटल्स रिसायकल करून अनोखं घर तयार करण्यात आलं आहे.
मेटागन नदीच्या किनारी तयार करण्यात आलेल्या या घरात तीन खोल्या आहेत. त्यासोबतच घरात एक किचन, बाथरूम आणि छतही आहे. हे घर बाहेरून बघताना साधारण वाटतं. पण आतून हे फारचं आलिशान वाटतं. कारण यात एका आलिशान घरासारख्या सगळ्याच अत्याधुनिक सुविधा आहेत.
हे अनोखं घर जोएल जर्मन आणि डेविड सउलनिर नावाच्या कंपनीने मिळून तयार केलं आहे. कंपनीनुसार, या घराच्या भींती खासप्रकारच्या फोमपासून तयार करण्यात आल्या आहेत. याला पीईटी म्हटलं जातं. हा फोम तयार करण्यासाठी प्लास्टिक कचरा रिसायकल करून एक आकार देण्यात आला आहे.
कंपनीनुसार, घराच्या भींती १५ सेंटीमीटर म्हणजे ५.९ इंच जाड आहेत. या भींती कठोरातल्या कठोर वातावरणाचा सामना करू शकतात. त्यासोबतच घराच्या भींती ३२६ मैल प्रति तासाच्या वेगाने वाहणाऱ्या हवेचा माराही सहन करण्यात सक्षम आहेत.
हे घर उभारण्यासाठी केवळ १४ तास इतका वेळ लागला. तर यासाठी खर्च ७५ लाख रूपये इतका आला आहे. या घरात सोफा, बेड, टेबलसारख्या सुविधाही आहेत.