ऐकावं ते नवलंच! बसमधून प्रवास करणाऱ्या कोंबड्याचं कंडक्टरनं कापलं तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:05 IST2022-02-10T15:04:04+5:302022-02-10T15:05:01+5:30
TSRTC bus conductor : ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ऐकावं ते नवलंच! बसमधून प्रवास करणाऱ्या कोंबड्याचं कंडक्टरनं कापलं तिकीट
तुम्ही जेव्हाही बसमधून प्रवास करता तेव्हा तुम्ही प्रवासाचे भाडे जरूर भरले असेल, पण तुम्ही कधी ऐकले आहे का की बसमध्ये प्रवास करणाऱ्या जनावरांकडून किंवा पक्ष्याकडूनही भाडे आकारले जाते? जर नसेल तर अशीच एक घटना घडली आहे. एका बस कंडक्टरने बसमध्ये प्रवास करणाऱ्या कोंबड्याचे प्रवास भाडे आकारले आहे. दरम्यान, ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (TSRTC) बसमध्ये प्रवास करण्यासाठी एका कोंबड्याचे 30 रुपये आकारले. तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात मंगळवारी ही विचित्र घटना घडली. ज्यावेळी टीएसआरटीसी बस कंडक्टरने एका प्रवाशाला कोंबडा घेऊन प्रवास करताना पाहिले आणि त्याच्याकडून कोंबड्याच्या प्रवासाचेही तिकीट शुल्क आकारले.
30 रुपये शुल्क आकारले
बस कंडक्टर जी तिरुपती यांना पेद्दापल्ली ते करीमनगरच्या प्रवासादरम्यान एका प्रवाशाने कापडात गुंडाळलेला कोंबडा लपवल्याचे दिसले. यानंतर जी तिरुपती यांनी आरटीसी बसमधील सर्व सजीव वस्तूंचे शुल्क आकारले जाते असे सांगत प्रवासी मोहम्मद अली यांना 30 रुपये देण्यास सांगितले. मोहम्मद अली यांनी सुरुवातीला विरोध केला, पण बस कंडक्टर जी तिरुपती यांनी कोंबडा घेऊन जाण्यासाठी तिकीटाचे शुल्क भरावे लागेल असा आग्रह केल्याने त्यांनी नंतर होकार दिला.
A rooster 🐓is a living being. Ticket is a must to travel in RTC bus.#Telanganapic.twitter.com/XEckxd9bXL
— P Pavan (@PavanJourno) February 8, 2022
अधिकाऱ्यांकडून घटनेची दखल
कंडक्टर आणि प्रवासी यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीएसआरटीसी अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली. टीएसआरटीसी गोदावरीखानी डेपो मॅनेजर व्ही व्यंकटेशम म्हणाले की, कंडक्टरने प्रवाशाला कोंबड्यासह खाली उतरण्यास सांगितले पाहिजे होते, कारण टीएसआरटीसी नियमांनुसार बसमध्ये प्राण्यांना परवानगी नाही. तसेच, प्रवाशाने कोंबडा कापडाखाली लपवल्याने कंडक्टरच्या लक्षात आले नसावे. याचबरोबर, निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि प्रवाशाकडून कोंबडा घेऊन नेण्याचे शुल्क आकारल्याबद्दल कंडक्टरकडून स्पष्टीकरण मागवले जाईल, असे व्यंकटेशम म्हणाले.