दुबईत लॅम्बॉर्गिनी पळवणं पर्यटकाला पडलं महागात, ३ तासात ३१ लाखांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 12:40 IST2018-08-08T12:40:06+5:302018-08-08T12:40:52+5:30
जगभरातील पर्यटक इथे आलिशान जगण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. असाच एक २५ वर्षीय पर्यटक दुबईमध्ये फिरायला आला होता.

दुबईत लॅम्बॉर्गिनी पळवणं पर्यटकाला पडलं महागात, ३ तासात ३१ लाखांचा दंड!
(Image Credit : CAR AND DRIVER)
दुबई : शौकीन लोकांचा गढ मानल्या जाणाऱ्या दुबईमधील कायदे आणि नियमही चांगलेच प्रसिद्ध आहेत. जगभरातील पर्यटक इथे आलिशान जगण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. असाच एक २५ वर्षीय पर्यटक दुबईमध्ये फिरायला आला होता. इथे त्याने तब्बल २ लाख ८० हजार रुपये खर्च करुन एक लॅम्बॉर्गिनी कार भाड्याने घेतली आणि दुबईच्या चिकन्या-चोपड्या रस्त्यावर २५० किमी प्रति तासाच्या वेगाने ही कार पळवली. नंतर जे झालं ते दुबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी एक शिकवणच आहे.
तीन तासात ३३ वेळा चलान
२ कोटींपेक्षा जास्त किंमत असलेली लॅम्बॉर्गिनी कार त्याने २५० किमी प्रति तासाच्या वेगाने पळवली होती. इतक्या वेगाने गाडी चालवणे हे दुबईच्या ट्रॅफिक नियमाचं उलंघन आहे. त्यामुळे येथील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या कॅमेरांनी ३३ वेळा चलान कापले. या पर्यटकाने सकाळी २.३० ते सकाळी ६ वाजताच्या सुमारास याच स्पीडचा नियम तोडला.

रेंटल कंपनीने जप्त केला पासपोर्ट
ज्या कंपनीकडून या व्यक्तीने कार भाड्याने घेतली होती त्या कंपनीच्या मालकाने त्या पर्यटकाचा पासपोर्ट जप्त केलाय. जेणेकरुन तो दुबईसोडून पळून जाऊ नये. ही गाडी कंपनीच्या मालकाच्या नावावर आहे आणि चलानही त्याच्या नावानेच आले आहेत. जर पर्यटकाने चलान भरण्यास नकार दिला तर कंपनीच्या मालकालाच साधारण ३१ लाख दंड भरावा लागेल.

किती आहे कारची स्पीड
लॅम्बॉर्गिनी ही एक सुपर कार आहे. जी ३३० किमी प्रति तासाच्या वेगाने जाऊ शकते. इतकेच नाही तर ही कार केवळ ३.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तासाच्या वेगाने धावू शकते.