पाकिस्तानात मुली-मुलींच्या फेक लग्नाचा ट्रेंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:09 IST2025-12-25T08:08:31+5:302025-12-25T08:09:08+5:30
या फेक वेडिंग्सची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे महिलांचं स्वातंत्र्य.

पाकिस्तानात मुली-मुलींच्या फेक लग्नाचा ट्रेंड!
पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजलेला स्टेज, मेहंदीचा दरवळलेला सुगंध, विजेच्या दिव्यांच्या झगमगत्या माळा आणि पारंपरिक संगीत.. स्टेजवर नवरा, नवरी आहेत.. पाहुणे मंडळी जमली आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे. संगीताच्या तालावर तरुण-तरुणी नाचताहेत, गाताहेत, माहौल एकदम बेभान झाला आहे..
अर्थातच हे आहे लग्न आणि या लग्नाचा ‘जश्न’ जोरदारपणे मनवला जातो आहे.. पण थोडंसं बारकाईनं पाहिलं तर लक्षात येतं, या लग्नात काहीतरी गडबड दिसते आहे. या लग्नात नवरदेवाच्या जागी त्याच्या पोशाखात तरुणी उभी आहे आणि नवरीच्या जागीही तरुणीच आहे! अच्छा! म्हणजे हा समलैंगिक विवाह आहे का? दोन तरुणींचं एकमेकींवर प्रेम जडल्यानं त्या विवाह करताहेत का? - पण नाही, तसंही नाहीए. हे लग्न तर ‘खरं’ आहे, पण तरीही ते ‘खोटं’, ‘फेक’ आहे!
- पाकिस्तानात सध्या तरुण मुलींमध्ये अशाच ‘फेक’ लग्नांचा ट्रेंड रुजतो आहे. तरुण मुली आपसांत खोटी खोटी लग्नं करताहेत. का हे असं? हा काय नवीनच प्रकार? - ही लग्नं खोटी आहेत, पण मस्ती शंभर टक्के खरी! पाकिस्तानमध्ये ‘फेक वेडिंग’चा नवा खेळ सुरू झाला आहे. याचं कारण तरुणींना कोणत्याही सामाजिक बंधनांतून मुक्त व्हायचं आहे. त्यांना स्वत:चं आयुष्य काही काळ तरी मुक्तपणे जगायचं आहे. त्यामुळे लग्न हे फक्त एक निमित्त, त्याचा खरा उद्देश मौज, मजा, मस्ती करणं. आनंद, उत्सव साजरा करणं!
या लग्नांमध्ये ना कोणत्या नात्यांचा दबाव, ना नातेवाईकांची नजर.. फक्त मेहंदी, ढोल, बेधुंद नाच-गाणी, मस्ती आणि बेफिकीर हसू. नकली लग्नांत लोक खरा आनंद शोधताहेत. पाकिस्तानात गेल्या चार वर्षांपासून हा अनोखा ट्रेंड व्हायरल होतो आहे. या ट्रेंडला खरी गती मिळाली २०२३ साली, जेव्हा लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) मध्ये आयोजित एक फेक वेडिंग सोशल मीडियावर व्हायरल झालं.
व्हिडीओत विद्यार्थी पारंपरिक पोशाखात नाचताना-गाताना दिसले आणि लगेचच इंटरनेटवर एक नवा वाद, चर्चा सुरू झाली. तरुणांनी या प्रकाराला स्वातंत्र्य आणि क्रिएटिव्ह एक्सप्रेशन म्हटलं, तर टीकाकारांनी त्याला ‘संस्कृतीशी खेळ’, पाश्चात्य थेर ठरवलं. या आणि अशाच कारणांनी आधीच रसातळाला गेलेला आपला देश आता अक्षरश: वाया चाललाय, असे ताशेरेही त्यांनी ओढले.
या फेक वेडिंग्सची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे महिलांचं स्वातंत्र्य. पारंपरिक लग्नांमध्ये जिथे महिलांना ‘संयमित’ राहण्याचा सल्ला दिला जातो, आपल्या ‘परंपरा’ पाळण्याचा आणि त्याचप्रमाणे वागण्याचा आग्रह धरला जातो, तिथे या लग्नांमध्ये मात्र त्यांना आपल्या मनाप्रमाणे मुक्त जगण्याची मुभा मिळते.
स्वत:ला हवं तसं त्या इथे व्यक्त होतात.. नाचतात, गातात, माैज-मस्ती करतात. कुठल्याही नातेवाईकांच्या घुरघुरत्या नजरा नाहीत, समाजाची भीती नाही. हेच कर, तेच कर, हे का केलं नाही, ते का केलं नाही.. अशी बंधनं नाहीत.. कारण याच बंधनांना इथल्या मुली कंटाळल्या आहेत. कायम बुरख्याआड, हिजाबच्याआड राहणं त्यांना मंजूर नाही.. हेच कारण आहे, पाकिस्तानात फेक वेडिंग मॅरेजेस, निकाह अत्यंत वेगानं लोकप्रिय होताहेत.