लव्ह मॅरेज किंवा प्रेमविवाह म्हटला की, आजही घरातून अनेक तरूण-तरुणींना विरोधाचा सामना करावा लागतो. विरोध टोकाला गेला की, कपल पळून जाऊन नवं आयुष्य जगण्याचा मार्ग स्वीकारतात. पण पळून गेल्यावरही नवीन सुरूवात करणं इतकं सोपं नसतं. पहिला प्रश्न समोर उभा राहतो की, रहायचं कुठे? काहींच निभावतं. पण अनेकांना या प्रश्नासमोर हात टेकावे लागतात आणि परतावं लागतं. अशात अशा पळून आलेल्या कपल्ससाठी एक मंदिर चांगलंच प्रसिद्ध आहे. कारण या मंदिरात पळून आलेल्या कपल्सना निवारा दिला जातो.

हिमाचल प्रदेश जगभरात आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी लोकप्रिय राज्य आहे. याच हिमाचल प्रदेशात शंगचूल महादेव मंदिर हे पळून आलेल्या जोडप्यांचं रक्षण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिमाचलमध्ये शांघड हे एक छोटसं गाव आहे. कुल्लूच्या सेंज व्हॅलीत हे गाव असून या गावाला महाभारत काळापासून ऐतिहासिक महत्व आहे.

(Image Credit : nativeplanet.com)

याच गावात हे शंगचूल महादेव मंदिर आहे. येथील खासियत म्हणजे जर कपल्स पळून येऊन या मंदिराच्या परिसरात पोहोचले तर ते इथे असेपर्यंत त्यांना कुणीही हात लावू शकत नाहीत. या मंदिराचा परिसर साधारण १०० गुंठे इतका आहे. कपल्स जर या परिसरात पोहोचले तर त्यांना शंगचूल महादेवाच्या चरणी आल्याचा मान मिळतो.

(Image Credit : patrika.com)

इथे पळून येणाऱ्या कपल्सना त्यांच्या समस्या नष्ट होईपर्यंत इथेच राहू दिलं जातं. त्यांची काळजी घेतली जाते. हे सगळं मंदिरातील पुजारी करतात. या गावाबाबत एक अशी मान्यता आहे की, अज्ञातवासाच्या काळात पांडव इथे आले होते. त्यावेळी  कौरव त्यांच्या मागे तिथे आले होते. पण त्यावेळी शंगचूल महादेवाने कौरवांना अडवले होते. तेव्हा कौरव परतले होते. 

(Image Credit : journeytoexplore.com)

तेव्हापासूनच समाजाने दूर केलेल्या लोकांचं किंवा प्रेमी युगुलांचं इथे रक्षण केलं जातं. त्यांना आश्रय दिला जातो. असे म्हणतात की, महादेव या जोडप्यांची रक्षा करतात. त्यांच्या समस्या सुटल्यावर ते कुठेही जाऊन राहू शकतात. पण काही अडचण असेल तर ती दूर होईपर्यंत तिथेच त्यांना राहता येतं.


Web Title: A temple in Himachal Pradesh where couple fleeing home get shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.