अनेक सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या विमानाचा पायलट बेशुद्ध पडतो किंवा काही कारणाने मरतो आणि विमान पायलटशिवाय आकाशात उडत राहतं. अशीच एक घटना घडली आहे. ही स्थिती किती भयंकर असेल याची केवळ कल्पनाच केली जाऊ शकते. झालं असं की, एका विमानाचा पायलट बेशुद्ध झाला आणि विमान तब्बल ४० मिनिटांपर्यंत आकाशात उडत राहिलं. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
अपुऱ्या झोपेने केला घोळ
रिपोर्ट्सनुसार, विमान ट्रेनी पायलट उडवत होता. ऑस्ट्रेलियाच्या एडलेड एअरपोर्टवर ४० मिनिटे हे विमान बेशुद्ध पायलटला घेऊन उडत राहिलं. सांगितले जात आहे की, पायलटने सकाळी नाश्ता केला नव्हता. तसेच त्याने रात्री पुरेशी झोपही घेतली नव्हती आणि सकाळी त्याला विमान उडवायचं होतं. अशात उड्डाण घेतल्यावर काही वेळातच तो बेशुद्ध झाला.
का झाला बेशुद्ध?
ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्यूरो(ATSB) ने या घटनेबाबत माहिती जाहीर केली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, ही घटना ९ मार्च रोजी घडली. एटीएसबीने खुलासा केला की, ट्रेनी पायलटची झोप पूर्ण झाली नव्हती आणि विमान उडवण्यापूर्वी त्याने नाश्ता म्हणूण केवळ एक चॉकलेट बार आणि एनर्जी ड्रिंक घेतलं होतं.
पायलट विमानात एकटा होता आणि तो प्लेन पोर्ट अगस्ता एअरपोर्टहून एडिलेड बाहेर पाराफील्ड एअरपोर्ट घेऊन जात होता. एटीएसबीने सांगितले की, 'उड्डाणापूर्वी पालयट पुरेशी झोप घेऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याला थोडं बरं नव्हतं'. एबीसी न्यूजनुसार, विमान जेव्हा ५५०० फूट उंचीवर होतं, तेव्हा त्याचं डोकं दुखू लागलं आणि तो बेशुद्ध झाला. चांगली बाब ही झाली की, त्यावेळी विमान ऑटो पायलट मोडवर होतं.
पायलटशी तुटला होता संपर्क
एटीएसबीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, डायमंड DA40 हे विमान विना क्लिअरन्स सकाळी साधारण ११ वाजता एडिलेडच्या आकाशात झेपावलं. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या टीमने पायलटशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कोणतही उत्तर मिळालं नाही. तेव्हाच बाजूने जात असलेल्या विमानातील पायलटचं लक्ष या बेशुद्ध पायलटवर गेलं. त्याच पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल यूनिटला माहिती दिली की, बेशुद्ध पायलट शुद्धीवर आलाय.
आता कठोर नियम
शुद्धीवर आल्यावर पायलट पाराफिल्ड हवाई अड्ड्याकडे विमान परत घेऊन आला. घटनेनंतर एडिलेड फ्लाइट ट्रेनिंगने एटीएसबीला सांगितले की, ते कठोर सुरक्षा नियम तयार करतील. ज्यात ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्यांना गेल्या २४ ते ४८ तासातील त्यांच्या झोपण्याच्या तासांची माहिती द्यावी लागेल.