Success Story Of Renuka Aradhya, A once begging boy has become a millionaire today pnm | ...तरीही जिद्द सोडली नाही! एकेकाळी भीक मागणारा मुलगा आज कोट्याधीश झाला

...तरीही जिद्द सोडली नाही! एकेकाळी भीक मागणारा मुलगा आज कोट्याधीश झाला

मुंबई – मेहनत आणि जिद्द असली की यशाचं शिखर गाठण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागत नाही, प्रत्येकाचं नशीब बदलतं असतं पण त्यासाठी त्याला मेहनतीची जोड असावी लागते. लहानपणी भिक्षा मागून खाणारा मुलगा आज कोट्यवधीच्या कंपनीचा मालक बनला आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही यशाची कहाणी आहे रेणुका आराध्य यांची, ते प्रवासी कॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत.

रेणुका यांचा जन्म बंगळुरु येथील एनेकाल तालुक्यातील गोपासंद्र गावात झाला. त्यांचे वडील राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या स्थानिक मंदिराचे पुजारी होते. मात्र त्यांना कोणतंही आर्थिक मानधन दिलं जात नव्हतं. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी रेणुका आराध्यच्या वडिलांना आसपासच्या गावात भिक्षा मागावी लागत असे, त्यांच्या या कामात रेणुकानेही साथ दिली. भिक्षेमध्ये लोकांनी दिलेल्या अन्नधान्यावर त्यांचे कुटुंब जगत होते.

घरची हालाखीची परिस्थिती असल्याने रेणुका यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यानंतर त्याच्या वडिलांना रेणुकाला एका वृद्ध व्यक्तीची सेवा करण्याचं काम दिलं. जवळपास एक वर्ष हे काम सुरु होतं. त्यानंतर रेणुकाला एका आश्रमात टाकण्यात आले. ज्याठिकाणी त्याला दिवसातून दोनदा जेवण दिलं जात असे, सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान त्यांना जेवण मिळत असे, पण याच आश्रमात त्यांच्या डोक्यात काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. दहावीत शिकत असताना वडिलांचे निधन झाले त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी रेणुकावर आली. यावेळी त्यांनी शिक्षण सोडून विविध कंपन्यांमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली.

३ वर्ष वेगवेगळ्या कंपनीत काम करत असताना त्यांच्या डोक्यात काहीतरी सुरु करण्याचा विचार घोंगावत होता. अशातच त्यांनी सुटकेस, वॅनिटी बॅग बनवण्याचा उद्योग सुरु केला. मात्र काही काळानंतर हा उद्योग बंद पडला. गुंतवणूक केलेले सर्व पैसे बुडाले. त्यानंतर मोठ्या भावाने ६०० रुपये पगारावर एका ठिकाणी सुरक्षा गार्ड म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण घरची जबाबदारी आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ड्रायव्हर बनण्याचं निश्चित केले. लग्नाची अंगठी विकून त्यांनी वाहन शिकवण्याचं प्रशिक्षण घेतले. त्यानंतर एके ठिकाणी नोकरी करत त्यांनी मृतदेह वाहतूक करण्याचं काम सुरु केले. निष्ठा आणि जिद्द या जोरावर त्याने ग्राहकांसोबत संबंध चांगले ठेवले. काही पैसे जमवल्यानंतर त्यांनी २००१ मध्ये सिटी सफारी म्हणून कंपनीची सुरुवात केली.

भीख मांगने वाला कुछ इस तरह बना ...

बँक लोन घेऊन त्यांनी इंडिका गाडी खरेदी केली, त्यानंतर दीड वर्षाच्या काळात दुसरी गाडी खरेदी केली. हळूहळू गाड्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यानंतर इंडियन सिटी टॅक्सी नावाची कंपनी विकत आहे अशी माहिती त्याला मिळाली. ही संधी न सोडता रेणुकाने सर्व गाड्या विकून, मार्केटमधून उधारी घेऊन ही कंपनी खरेदी करण्याची जोखीम पत्करली. यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच मागे वळून पाहिलं नाही.

भीख माँगने वाला रेणुका आराध्य बना ...

त्यांची प्रवासी कॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावारुपाला आली. एकेकाळी ४ गाड्या असताना आज त्याची संख्या ३०० झाली आहे. बंगळुरुनंतर चेन्नई येथे त्यांनी आपली शाखा उघडली आहे. एमेझोन, गुगल, वॉलमार्ट, जनरल मोटर्ससारख्या बड्या कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत. ग्राहकांशी चांगले संबंध आणि विश्वास कमावल्यामुळे ओला, उबेरसारख्या कंपन्यांनाही आजतागायत त्यांनी मागे ठेवले आहे. त्यांच्या कंपनीत १ हजारपेक्षा जास्त लोक काम करतात. वर्षाला ४०-५० कोटींची आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे तुम्हीही लक्षात ठेवा, अपयश आलं म्हणून खचून न जाता त्यावर मात करून यश गाठण्याचं स्वप्न बाळगा, नक्कीच यश मिळेल.   

Web Title: Success Story Of Renuka Aradhya, A once begging boy has become a millionaire today pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.