जगातील सर्वात दीर्घकाळ चालणारी परीक्षा; CSAT साठी 13 तास संपूर्ण देश थांबतो..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:38 IST2025-11-14T14:37:52+5:302025-11-14T14:38:45+5:30
South Korea: परीक्षेसाठी 10,475 पोलिस अधिकारी आणि 2,238 पेट्रोलिंग वाहने देशभरात तैनात!

जगातील सर्वात दीर्घकाळ चालणारी परीक्षा; CSAT साठी 13 तास संपूर्ण देश थांबतो..!
South Korea:दक्षिण कोरियातील अत्यंत महत्वाची आणि जगातील सर्वात कठीण मानली जाणारी कॉलेज स्कॉलास्टिक अबिलिटी टेस्ट (CSAT) परीक्षा गुरुवारी संपली. ही परीक्षा काही विद्यार्थ्यांसाठी तब्बल 13 तासांपर्यंत चालते, त्यामुळे या परीक्षेला जगातील सर्वात लांब परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेदरम्यान देशभरात विशेष आणि कडेकोट व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
5.54 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
योनहाप न्यूजच्या माहितीनुसार, या वर्षी CSAT साठी 5,54,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 6% जास्त आहे आणि 2018 नंतरची सर्वात मोठी संख्या आहे. या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो, म्हणूनच ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरते. परीक्षा 8:40 ते 5:45 या वेळेत 1,310 केंद्रांवर घेण्यात आली.
परीक्षा काळात शांतता राखण्यासाठी विशेष उपाय
CSAT दरम्यान शांतता राखण्यासाठी सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले. विशेषतः इंग्लिश लिसनिंग सेक्शनच्या 35 मिनिटांसाठी (दुपारी 1:05 ते 1:40) देशातील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली. सैन्य व नागरी, दोन्ही प्रकारचे विमानतळ व्यवहार थांबले, फक्त अत्यावश्यक उड्डाणांना परवानगी होती. याशिवाय, ड्रोन आणि हलक्या विमानांवरही पूर्ण बंदी घातली होती. यामुळे 140 उड्डाणांचे वेळापत्रक बदलावे लागले.
विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचवण्यासाठी पोलिस सज्ज
10,475 पोलिस अधिकारी आणि 2,238 पेट्रोलिंग वाहने देशभरात तैनात होती. ट्रॅफिक कमी ठेवण्यासाठी शेअर मार्केट उघडण्याची व बंद होण्याची वेळ एक तास उशिराने झाली. उशीर होत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलिस कार आणि मोटरसायकली तैनात होत्या. सियोलमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी पाहता 29 अतिरिक्त मेट्रो गाड्या चालवण्यात आल्या. सरकारी ऑफिसदेखील सकाळी 10 वाजता सुरू करण्याचे निर्देश होते.
CSAT म्हणजे काय?
कोरियन भाषेत याला ‘सुनेंग’ म्हणतात. ही परीक्षा दरवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातील गुरुवारी घेण्यात येते. हायस्कूलचे अंतिम वर्ष किंवा पात्र विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. परीक्षा 5 विषयांची असून साधारण 8 तासांची असते. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 13 तासांपर्यंत चालते. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना इतरांच्या तुलनेत 1.7 पट जास्त वेळ दिला जातो. जर त्यांनी अतिरिक्त विदेशी भाषा निवडली, तर त्यांची परीक्षा रात्री 21:48 वाजेपर्यंत, म्हणजे जवळपास 13 तास, चालू शकते. या कारणामुळे CSAT ही जगातील सर्वात लांब लेखी परीक्षा मानली जाते.
किमान तीन वर्षांची तयारी
कोरियातील विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे कठोर अभ्यास करतात. सरकारकडूनच 10 हून अधिक मॉक टेस्ट घेतल्या जातात. परीक्षेची उत्तरपत्रिका 25 नोव्हेंबरला आणि मार्कशीट 5 डिसेंबरला दिली जाणार आहे.