रस्त्यात किलोच्या भावानं विकतायेत नोटांची बंडल; कारण ऐकलं तर विश्वास बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:01 IST2025-03-12T17:00:36+5:302025-03-12T17:01:20+5:30
हा जगातील असा देश आहे ज्याची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर टिकून आहे. त्याशिवाय पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस आहे.

रस्त्यात किलोच्या भावानं विकतायेत नोटांची बंडल; कारण ऐकलं तर विश्वास बसणार नाही
आपण घरातून बाहेर पडत बाजारात गेलो तर तिथे सगळीकडे तुम्हाला भाजी मार्केट आणि फळविक्रेते दिसतात. रस्त्यात लावलेल्या दुकानावर अन्य सामानही विकले जाते. आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा असतो, विना पैसा आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही. भारतात एटीएमपासून बँकांपर्यंत पैसे सुरक्षित ठेवले जातात. परंतु तुम्ही कधी बाजारात नोटांची बंडल विकताना पाहिलंय का? ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु आम्ही एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे नोटांची बंडल लोक किलोच्या भावाने खरेदी करतात.
हा जगातील असा देश आहे ज्याची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर टिकून आहे. त्याशिवाय पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस आहे. हा देश आहे उत्तर आफ्रिका खंडातील सोमालीलँड, १९९१ साली सोमालिया देशापासून वेगळं होऊन काही लोकांनी सोमालीलँड हा नवा देश बनवला होता. आतापर्यंत या देशाला कुठलीही जागतिक मान्यता नाही. एका रिपोर्टनुसार ४० लाख लोकसंख्या असलेला हा देश अत्यंत गरीब आहे. सोमालीलँडचं चलन शिलिंग आहे ज्याची कुठल्याही देशात किंमत नाही. याठिकाणी एक अमेरिकन डॉलर म्हणजे ९ हजार शिलिंग नोट असतात. सोमालीलँडमध्ये शिलिंगच्या ५०० आणि १००० नोट चलनात आहे.
या देशातील निम्मा भाग वाळवंट आहे तर उर्वरित भागात कायम दुष्काळ पडलेला असतो. या देशातून सर्वात जास्त उंच निर्यात केले जातात परंतु तरीही देशाची अर्थव्यवस्था सुधारली नाही. सर्वात खास गोष्ट म्हणजे इथला बाजार. या बाजारात तुम्हाला फळ, भाज्या कमी परंतु नोटांचे बंडल जास्त विक्रीस दिसतात. याठिकाणी तुम्ही एक सिगारेट घेतली तरी त्यासाठी ५०० ची नोट मोडावी लागते. भाजी खरेदी करायची असेल तर पिशवी भरून नोटांचा ढीग घेऊन जावा लागेल. सोमालीलँड येथे जर मौल्यवान दागिने खरेदी करायचे असतील तर त्यांना गाडी भरून शिलिंग नोटा घेऊन जाव्या लागतील. नोटा रद्दीसारख्या विकल्या जात असल्याने बहुतांश लोक कॅशलेस व्यवहार करतात.
का विकल्या जातात नोटा?
आपल्या देशातील चलनाचं मूल्य काहीच नसल्याने सोमालीलँड इथले लोक त्यांच्याकडील चलन कमी पैशात विकून ते बर्बाद होण्यापासून रोखतात. अमेरिकेच्या १० डॉलरमध्ये ५० किलो शिलिंग खरेदी केले जाऊ शकते. सोमालीलँड देशात कुठलीही बँकिंग व्यवस्था नाही. संपूर्ण देशात एकही बँक, एटीएम सिस्टम नाही. याठिकाणचे लोक एका कंपनीत पैसे जमा करतात. फोनच्या माध्यमातून सामान खरेदी विकले जाते.