'हे' आहे भारतातील अखेरचं स्टेशन...इथं उतरून तुम्ही पायी चालत परदेशात जाऊ शकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:41 IST2022-12-07T11:41:06+5:302022-12-07T11:41:32+5:30
या रेल्वे स्थानकाचा उपयोग माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. मैत्री एक्सप्रेस नावाच्या दोन पॅसेंजर गाड्या येथून जातात.

'हे' आहे भारतातील अखेरचं स्टेशन...इथं उतरून तुम्ही पायी चालत परदेशात जाऊ शकता
नवी दिल्ली - परदेशात फिरण्याचं आवड भले कुणाला नसते? हा विचार आला तर विमान प्रवासाचा विचार पहिला मनात येतो. पण तुम्हाला माहित आहे का की देशात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथून पायी चालत परदेशात जाता येते. शेजारील देशांना लागून असलेल्या सीमाभागातून हे शक्य आहे. तिन्ही बाजूंनी भारतीय सीमांनी वेढलेल्या नेपाळचे उदाहरण घ्या. जोगबानी हे बिहारमधील अररिया जिल्ह्यातील ठिकाण आहे. हे भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे, जिथे उतरून नेपाळला पायी जाता येते. असेच एक शेवटचे स्टेशन सिंघाबाद आहे, जे पश्चिम बंगालमध्ये येते.
भारतातील शेवटच्या रेल्वे स्टेशनचे नाव सिंघाबाद आहे. हे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. या स्थानकात विशेष काही नसले तरी बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले हे भारताचे अखेरचे बॉर्डर स्टेशन आहे. ब्रिटीश राजवटीच्या काळातील हे स्टेशन आहे आणि जसे इंग्रजांनी हे स्टेशन सोडले होते तसे आजही चित्र फारसे बदललेले नाही. ते बांगलादेशच्या सीमेला लागून वसलेले आहे. सिंघाबाद बांगलादेशच्या इतके जवळ आहे की लोक काही किलोमीटर चालत बांगलादेशात जातात. या छोट्या रेल्वे स्टेशनवर फारसे लोक दिसत नाहीत. या रेल्वे स्थानकाचा उपयोग माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. मैत्री एक्सप्रेस नावाच्या दोन पॅसेंजर गाड्या येथून जातात.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाली, त्यानंतर या स्थानकाचे काम थांबले आणि हे स्थानक ओसाड पडले. १९७८ मध्ये जेव्हा या मार्गावर मालगाड्या सुरू झाल्या, तेव्हा पुन्हा शिट्ट्यांचे आवाज येऊ लागले. पूर्वी ही रेल्वे भारतातून बांगलादेशात येत जात असत. नोव्हेंबर २०११ मध्ये जुन्या करारात दुरुस्ती केल्यानंतर शेजारील देश नेपाळचाही त्यात समावेश करण्यात आला. या स्थानकात सिग्नल, दळणवळण आणि स्टेशनशी संबंधित उपकरणे आजतागायत बदलण्यात आलेली नाहीत, उलट सर्व काही जुन्याच धर्तीवर सुरू आहे. येथे अजूनही सिग्नलसाठी हँड गिअर्स वापरतात. रेल्वे कर्मचारीही येथे केवळ नावालाच आहेत. येथील तिकीट काउंटर बंद करण्यात आले आहे. फक्त मालगाड्या सिग्नलची वाट बघतात, ज्यांना रोहनपूरमार्गे बांगलादेशला जायचे असते.