जगातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे केवळ एका मुलीसाठी थांबत होती रेल्वे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:45 IST2025-02-28T11:45:17+5:302025-02-28T11:45:46+5:30
World Unique Railway: रेल्वे विभागानं असं का केलं असेल आणि कुणासाठी स्टेशनवर रेल्वे थांबत होती हे वाचाल तर तुम्हालाही भारी वाटेल.

जगातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे केवळ एका मुलीसाठी थांबत होती रेल्वे!
World Unique Railway: जगभरात नेहमीच अशा काही घटना समोर येत असतात ज्यातून हे दिसतं की, जगात अजूनही माणुसकी किंवा चांगुलपणा शिल्लक आहे. या घटना आपल्यात एक सकारात्मकता निर्माण करतात आणि जगाकडे बघण्याची दृष्टीकोन बदलतात. जपानमधील एक अशी घटना आहे. इथे साधारण ९ वर्षाआधी एका रेल्वे स्टेशनवर फक्त एका प्रवाशासाठी दिवसातून दोनदा रेल्वे थांबत होती. रेल्वे विभागानं असं का केलं असेल आणि कुणासाठी स्टेशनवर रेल्वे थांबत होती हे वाचाल तर तुम्हालाही भारी वाटेल.
एका प्रवाशासाठी थांबत होती रेल्वे
ब्लूमबर्गच्या २०१६ च्या एका रिपोर्टनुसार, जपानच्या होकाइडोमध्ये एक छोटं आणि शांत रेल्वे स्टेशन होतं. क्यू-शिराटाकी असं या रेल्वे स्टेशनचं नाव होतं. महत्वाची बाब म्हणजे इथे केवळ दोनदा रेल्वे थांबत होती. याचं कारण एक १६ वर्षांची मुलगी होती. या मुलीला रोज शाळेत जाण्यासाठी ३५ मिनिटांचा रेल्वेचा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे स्टेशन खासकरून तिच्यासाठी सुरू ठेवण्यात आलं होतं.
या मुलीच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून जपान रेल्वे विभागानं हा निर्णय घेतला होता. जोपर्यंत तिची शाळा संपत नाही तोपर्यंत रेल्वे चालू ठेवण्यात आली. २५ मार्च २०१६ ला मुलीची शाळा संपली. तेव्हा सरकारनं हे स्टेशन बंद केलं. कारण त्याची गरज नव्हती.
त्यावेळी मुलीचं वय १८ होतं आणि तिचं नाव काना हराडा आहे. मुलीच्या जीवनात या स्टेशनला खूप महत्व आहे. ती रॉयटर्ससोबत बोलताना म्हणाली की, ते रेल्वे स्टेशन बंद झाल्याचं दु:खं तर आहे. पण सोबतच आनंदही आहे की, तीन वर्ष तिच्यासाठी स्टेशन सुरू ठेवण्यात आलं.