कावळ्यांना घ्यायचाय बदला; 'तो' घराबाहेर पडताच करतात आक्रमण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:12 IST2019-09-03T13:04:56+5:302019-09-03T13:12:29+5:30
मध्य प्रदेशातील ही घटना असून इथे गेल्या तीन वर्षांपासून एक व्यक्ती कावळ्यांमुळे हैराण झाली आहे.

कावळ्यांना घ्यायचाय बदला; 'तो' घराबाहेर पडताच करतात आक्रमण!
(Image Credit : standard.co.uk)
नागीण समोर नागाला मारलं तर नागीण नंतर बदला घेते असं अनेकदा आपण गंमत म्हणून ऐकलं असेलच. पण कधी कावळेही बदला घेतात असं ऐकलंय का? नाही ना? मात्र, अशी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ही घटना असून इथे गेल्या तीन वर्षांपासून एक व्यक्ती कावळ्यांमुळे हैराण झाली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार. शिव असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती शिवपुरी जिल्ह्यातील सुमेला या गावात राहते. शिव जेव्हाही घराबाहेर पडतो तेव्हा त्याची नजर नेहमी आकाशाकडे लागलेली असते. त्याच्या मनात सतत भीती असते. कारण घरातून निघाल्यावर काही दूर गेल्यावर शिव याच्यावर कावळे तुटून पडतात. त्याच्यावर चोचेने आणि पंजांनी वार करू लागतात. कधी कधी तर हे कावळे गॅंग करून त्याच्यावर हल्ला करतात. तर कधी एकच कावळा त्याच्या मागे लागतो.
शिव याच्यासोबत असं रोज होतं. तो कितीही वेळा घराबाहेर पडला तरी हे घडतं. इतकंच काय तर आता गावासाठी हा मनोरंजनाचा विषय झाला आहे. कारण कावळे सतत त्याच्या घराच्या आजूबाजूला त्याची घराबाहेर येण्याची वाट बघत बसलेले असतात.
शिवसोबत तीन वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. एका लोखंडाच्या जाळीत कावळ्याचं पिलू फसलेलं होतं. ते काढण्याचा प्रयत्न शिवने केला होता. यावर शिव सांगतो की, 'त्या कावळ्याच्या पिलाने माझ्या हाताज जीव सोडला होता. मी जर कावळ्यांना समजावू शकलो असतो तर त्यांना सांगितलं असतं की, मी त्याची केवळ मदत करत होतो. पण त्यांना वाटतं की, मीच त्याला मारलं'.
आता शिव जेव्हाही घराबाहेर पडतो तेव्हा कावळे त्याच्या डोक्यावर फिरतात आणि त्याला घाबरवतात. शिवच्या शरीरावर कावळ्यांनी केलेल्या हल्ल्याच्या अनेक खुणाही आहेत. शिव या गोष्टीने हैराण आहे की, कावळे सुद्धा वैर ठेवू शकतात आणि मनुष्यांचा चेहरा लक्षात ठेवू शकतात.
आता खरंच असं होतं का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या अभ्यासकांचंही असं मत आहे की, कावळ्यांची स्मरणशक्ती फार चांगली असते. आणि ज्या लोकांनी त्यांना त्रास दिलेला असतो त्याचा चेहरा ते लक्षात ठेवतात.