'हे' आहे जगातील सगळ्यात महाग सोन्याचं नाणं, ज्याच्याकडे असेल तो होईल कोट्याधीश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:06 IST2024-12-27T16:05:46+5:302024-12-27T16:06:35+5:30
Most Costly Coin : सोशल मीडियावर या नाण्याबाबत सांगण्यात आलं आहे. हे नाणं ज्या कुणाकडे असेल ती व्यक्ती कोट्याधीश बनेल. चला जाणून घेऊ असं काय आहे या नाण्यात.

'हे' आहे जगातील सगळ्यात महाग सोन्याचं नाणं, ज्याच्याकडे असेल तो होईल कोट्याधीश!
Most Costly Coin : तुम्ही अनेक अशा घटनांबाबत ऐकलं किंवा वाचलं असेल की, एखादी व्यक्ती त्याच्याकडील एखादी जुनी दुर्मीळ नोट किंवा नाणं विकून ती श्रीमंत झाली. असे बरेच लोक असतात ज्यांच्या हाती फार जुन्या दुर्मीळ गोष्टी लागतात. त्यांचा लिलाव करून कोट्याधीश बनतात. अशात सध्या एक असंच नाणं चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर या नाण्याबाबत सांगण्यात आलं आहे. हे नाणं ज्या कुणाकडे असेल ती व्यक्ती कोट्याधीश बनेल. चला जाणून घेऊ असं काय आहे या नाण्यात.
डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील या नाण्याचं नाव गोल्ड डबल ईगल असं आहे. ही नाणी १९३३ मध्ये बनवण्यात आली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर @CoinCollectingWizard नावाच्या एका यूजरनं याबाबत माहिती दिली. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, हे नाणं इतकं दुर्मीळ आणि किंमती का? तर ग्रेट डिप्रेशन दरम्यान अशी ४,४५,५०० नाणी बनवण्यात आली होती. जी अमेरिकेने अधिकृत चलनात वापरली नव्हती.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन रूझवेल्ट यांनी त्यावेळी सोन्याच्या नाण्यांच्या निर्मितीवर बंदी घातली होती. त्यांनी नागरिकांनाही सल्ला दिला होता की, जर त्यांच्याकडे ही नाणी असतील तर ती परत करावी. त्यावेळी ६ लाख नाणी गोळा करण्यात आली होती. पण एका कर्मचाऱ्याच्या चलाखीमुळे अशी १० नाणी परत जमा करण्यात आली नव्हती. हे नाणं त्यापैकीच एक आहे आणि याच कारणानं फार दुर्मीळ आहे.
१६१ कोटी रूपयांचं नाणं
हे नाणी कुणालाही १०० कोटींपेक्षा जास्त रूपये मिळवून देऊ शकतं. असं मानलं जातं की, जी नाणी शिल्लक आहेत, ती कुणा ना कुणाकडे लपून ठेवून असतील. सीएनएनच्या एका २०२१ च्या रिपोर्टनुसार, एक डबल ईगल गोल्ड कॉईन त्याचवर्षी न्यूयॉर्कमध्ये १६१ कोटी रूपयांना विकण्यात आलं होतं. हे नाणं मुळात २० डॉलरचं होतं. १९४४ मध्ये सीक्रेट सर्व्हिसकडून घोषित करण्यात आलं होतं की, जर कुणाकडे हे नाणं असेल तर ते नाणं चोरी केलेलं ग्राह्य धरून कारवाई केली जाईल.