VIDEO: वृद्ध महिलेच्या भेटीला आलं माकड; गळाभेट घेतली, डोक्यावरून मायेनं हात फिरवून निघून गेलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 15:16 IST2021-06-28T15:14:02+5:302021-06-28T15:16:33+5:30

महिला आणि माकडाच्या भेटीची पंचक्रोशीत चर्चा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

monkey came to the house of the elderly woman hugged her video goes viral | VIDEO: वृद्ध महिलेच्या भेटीला आलं माकड; गळाभेट घेतली, डोक्यावरून मायेनं हात फिरवून निघून गेलं

VIDEO: वृद्ध महिलेच्या भेटीला आलं माकड; गळाभेट घेतली, डोक्यावरून मायेनं हात फिरवून निघून गेलं

जोधपूर: एका वृद्ध महिलेच्या भेटीला आलेल्या एका माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माकड आणि महिलेच्या भेटीचा हा व्हिडीओ राजस्थानमधल्या जोधपूरचा आहे. फलौदी परिसरात राहणाऱ्या भंवरीदेवी यांच्या घरात एक माकड शिरलं होतं. दोघांची अनेक वर्षांची ओळख असावी असं वाटावं अशी ही भेट होती. माकडानं भंवरीदेवी यांना मिठी मारली. त्यांच्या डोक्यावरून जिव्हाळ्यानं हात फिरवला. थोडा वेळ त्यांच्या शेजारी बसलं आणि मग निघून गेलं. सध्या या भेटीची पंचक्रोशीत चर्चा आहे.

भंवरीदेवी आणि माकडाच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भंवरीदेवी काल त्यांच्या घरात बेडवर आराम करत होत्या. तितक्यात त्यांच्या खोलीत एक माकड आलं. जवळपास अर्धा तास हे माकड भंवरीदेवी यांच्या शेजारी होतं. ते काही वेळ भंवरीदेवींच्या पोटावर बसलं. त्यांना अलगद मिठी मारली. डोक्यावरून मायेनं हात फिरवला. त्यानंतर हे माकड तिथून निघून गेलं. मात्र त्यानंतर या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. 

माकड आणि भंवरीदेवींची भेट होत असताना तिथे उपस्थित असलेल्या काही मुलांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. विशेष म्हणजे जवळपास अर्धा तास माकड भंवरीदेवींजवळ असताना कुटुंबातील व्यक्तींनी त्याला आंबे, बिस्किट्स खायला दिली. मात्र यातल्या एकाही वस्तूला माकडानं हात लावला नाही. माकड भंवरीदेवींजवळ अतिशय मायेनं बसलं होतं. भंवरीदेवींना ते अगदी प्रेमानं बिलगलं. त्यांना मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावरून, डोक्यावरून माकडानं अतिशय जिव्हाळ्यानं हात फिरवला. विशेष म्हणजे एक माकड अचानक येऊन पोटावर बसलं असतानादेखील भंवरदेवींना काहीच वावगं वाटलं नाही. आपल्याला त्या माकडाचं वजन जाणवलंही नाही, असं भंवरीदेवींनी सांगितलं.

Web Title: monkey came to the house of the elderly woman hugged her video goes viral