करोडपती झाला कंगाल! एकेकाळी हेलिकॉप्टरने करायचा प्रवास; आता राहतो झोपडीत अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 15:54 IST2023-08-07T15:15:08+5:302023-08-07T15:54:04+5:30
एका व्यक्तीकडे एके काळी कोट्यवधी होते, पण आता त्याचं नशीब बदललं असून तो झोपडपट्टीत राहतो आणि इतरांच्या घरांना रंग मारण्याचं काम करून आपला खर्च भागवतो.

फोटो - Canva
एखाद्या व्यक्तीचं नशीब कसं, कधी आणि केव्हा बदलेल हे सांगता येत नाही. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं आहे. एका व्यक्तीकडे एके काळी कोट्यवधी होते, पण आता त्याचं नशीब बदललं असून तो झोपडपट्टीत राहतो आणि इतरांच्या घरांना रंग मारण्याचं काम करून आपला खर्च भागवतो.
ली रयान नावाच्या या व्यक्तीला एकाच वेळी 68 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली होती, पण श्रीमंत होणं त्याला फारसं झेपलं नाही. आलिशान जीवनाचा आनंद लुटत असतानाच हा माणूस रस्त्यावर आला आणि आता असेच दिवस पुढे ढकलत आहे. सध्या त्याची चर्चा रंगली आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील रहिवासी ली रयान यांना 1995 मध्ये 6.5 मिलियन पाउंड म्हणजेच 68 कोटी रुपयांची लॉटरी लागली. ही त्या काळातील सर्वात मोठी लॉटरी मानली जात होती. एवढ्या पैशाचं काय करावं हे रयानला समजत नव्हतं. तो श्रीमंतांसारखे पैसे खर्च करू लागला. एक आलिशान बंगला घेतला आणि स्वतःसाठी अनेक आलिशान गाड्या घेतल्या. सुपर बाईक घेतली आणि हेलिकॉप्टरही घेतले. सुरुवातीला त्याने खूप मजा केली, परंतु 2010 पर्यंत तो गरीब झाला.
पैसे संपायला लागल्यावर घरही विकले गेले. तो पुन्हा लंडनच्या झोपडपट्टीत राहताना दिसला. लॉटरी जिंकल्यानंतर 9 महिन्यांतच रयान कार चोरीप्रकरणी तुरुंगात गेला. हळूहळू परिस्थिती अशी बनली की, घरांना रंगरंगोटी आणि सजावट करून तो आपला खर्च भागवू लागला. मात्र, तरीही त्याचा आपल्या नशिबावर विश्वास आहे आणि तो बंपर लॉटरी जिंकणार असल्याचे सांगतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.