ऐकावं ते नवलंच! 20व्या वर्षी म्हैस चोरली अन् 78व्या वर्षी अटक झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:59 IST2023-09-14T18:58:57+5:302023-09-14T18:59:31+5:30
1965 साली म्हैस चोरीप्रकरणी एका वृद्धाला अटक करण्यात आले.

ऐकावं ते नवलंच! 20व्या वर्षी म्हैस चोरली अन् 78व्या वर्षी अटक झाली
कर्नाटकात म्हैस चोरीचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. म्हैस चोरीप्रकरणी एका 78 वर्षीय वृद्धाला अटक करण्यात आली. त्याच्यावर 58 वर्षांपूर्वी दोन म्हैशी आणि एक वासरू चोरल्याचा आरोप आहे. 1965 मध्ये गणपती विठ्ठल वाघोरे आणि त्यांच्या एका साथीदाराला चोरीच्या आरोपाखाली पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यावेळी गणपती वाघोरे 20 वर्षांचे होते. त्यावेळी दोघांनाही जामीन मिळाला होता. त्यानंतर ते फरार झाले.
गणपती वाघोरे यांच्यासोबत चोरीचा आरोप असलेला दुसऱ्या व्यक्तीचे 2006 मध्ये त्यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात न्यायालयाने वाघोरे यांना पुन्हा अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका केली. त्याचे वय लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला. काही आठवड्यांपूर्वी पोलिसांनी प्रलंबित तपासाच्या जुन्या फायलींची पाहणी केली असता चोरीचे हे प्रकरण पुन्हा उघडकीस आले. यानंतर फरार लोकांचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
म्हैस चोरीची घटना कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात घडली. गणपती वाघोरे यांना दोन्ही वेळा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावातून पकडण्यात आले. वाघोरे आणि कृष्ण चंदर यांनी 1965 मध्ये जनावरे चोरल्याची कबुली दिली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने दोघांना सशर्त जामीन मंजूर केला. मात्र सुटका झाल्यानंतर दोघांनीही वॉरंट आणि समन्सला उत्तर देणे बंद केले.
यानंतर त्यांच्या शोधासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील गावोगावी अनेकवेळा पोलिस पाठवण्यात आले, मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. कृष्णा चंदर यांचा यापूर्वीच मृत्यू झआला, तर वाघोरे यांना नांदेड जिल्ह्यातील ठकलगाव गावातून अटक करण्यात आले. त्यांना कर्नाटक कोर्टात हजर करण्यात आले, कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.