जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जाण्यास लोक घाबरतात. पण काही असेही लोक आहेत, जे कोणतीही भीती न बाळगता सगळ्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगतात. असंच एक उदाहरण जॉर्जियामधील सांगता येईल. इथे एका साधुने १३० फूट उंच डोंगरावर घर बांधलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ते या घरात एकटेच राहतात.
या साधुंचं नाव आहे मेक्जिम. इतक्या उंच डोंगरावर ते गेल्या २५ वर्षांपासून ते एकटेच राहतात. यामागे त्यांचं असं मत आहे की, इथे राहण्यादरम्यान ते देवाच्या आणखी जवळ पोहोचले आहेत.
मेक्जिम हे या डोंगरावरून आठवड्यातून दोनदा खाली उतरतात. इथे चढण्या-उतरण्यासाठी १३० फूटाच्या पायऱ्याही तयार केल्या आहेत. डोंगरावरून या पायऱ्यांच्या माध्यमातून खाली उतरण्यासाठी साधारण २० मिनिटांचा वेळ लागतो.
या डोंगराला 'कात्स्खी पिलर' या नावाने ओळखलं जातं. मेक्जिम यांचे भक्त त्यांच्या गरजेच्या वस्तू वर पोहोचवतात. डोंगरावर तयार करण्यात आलेल्या घरात एक प्रार्थना कक्षही आहे. जिथे जाऊन कुणीही प्रार्थना करू शकतं.
मीडिया रिपोर्टनुसार, साधू होण्याआधी मेक्जिम तरूण असताना दारू आणि ड्रग्सच्या आहारी गेले होते. दरम्यान त्यांना अनेकदा तुरूंगातही जावं लागलं होतं. पण तुरूंगातून बाहेर आल्यावर त्यांचं जीवन बदललं आणि ते एक साधू झालेत.