जेवण करताना चुकून नकली दात तरूणाच्या पोटात गेले, एक्स-रे पाहून डॉक्टर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 17:00 IST2023-05-20T16:59:19+5:302023-05-20T17:00:49+5:30
एका 22 वर्षीय मुलाने त्याचे मूळ दात खराब झाल्यानंतर चांदीचे नकली दात बसवले. पण त्याच्यासोबत अशी काही घटना घडली की, वाचून सगळेच हैराण झाले.

जेवण करताना चुकून नकली दात तरूणाच्या पोटात गेले, एक्स-रे पाहून डॉक्टर हैराण
Artificial Teeth: वाढत्या वयासोबत दात तुटणं हे काही नवीन नाही. अनेकदा लोक त्यांचे नैसर्गिक दात तुटल्यानंतर नकली दात बसवतात. अमेरिकेतील एका 22 वर्षीय मुलाने त्याचे मूळ दात खराब झाल्यानंतर चांदीचे नकली दात बसवले. पण त्याच्यासोबत अशी काही घटना घडली की, वाचून सगळेच हैराण झाले. त्याने चुकून त्याचे नकली दात गिळले, ज्यानंतर त्याला चांगलाच त्रास झाला.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या तरूणाने चांदीचे दात यासाठी बसवले होते कारण त्याचे खरे दात लवकर खराब झाले होते. अशात तो अलिकडेच जेवण करत होता आणि यावेळीच चुकून त्याचे नकली दात त्याच्या पोटात गेले. आधी तर दात त्याच्या घशात अडकले होते आणि नंतर पोटात गेले.
घटनेनंतर तात्काळ हा तरूण हॉस्पिटलमध्ये गेले. जेव्हा डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला तेव्हा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. एक्सरे
रिपोर्टमध्ये दिसत आहे की, दातांचा एक भाग त्याच्या फुप्फुसात अडकला आहे. डॉक्टरांनी ते एका ट्यूबच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला. पण यात यश आलं नाही. जेव्हा त्यांनी ट्यूब टाकली तेव्हा दात आणखी आत गेले.
शेवटी डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दात बाहेर काढण्यात आले. एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, सुरूवातीला तरूणाची स्थिती अशी झाली होती की, त्याच्या फुप्फुसाच्या वायुमार्गात मांसपेशी टाइट झाल्या होत्या. डॉक्टर म्हणाले की, थोडा आणखी उशीर झाला असता तर श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला असता. कारण श्वास अजिबात आत-बाहेर होत नव्हता. आता तो बरा आहे.