'ही' महिला १,८५,००० रुपये पगार द्यायला तयार; निर्णय तुम्हाला घ्यायचाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 14:35 IST2019-02-09T14:33:21+5:302019-02-09T14:35:27+5:30
त्याचं झालंय असं की, या महिलेसाठी गेलं वर्ष अत्यंत वाईट्ट ठरलं. न्यूझीलंडमध्ये फिरायला गेली असताना ती रस्ताच चुकली....

'ही' महिला १,८५,००० रुपये पगार द्यायला तयार; निर्णय तुम्हाला घ्यायचाय!
योग्य वेळी अचूक निर्णय घेता येणं 'बहोत बडी चीज है बाबू', असंच म्हणावं लागेल. करिअर, लग्न, नोकरी, मूल, गुंतवणूक याबाबतचे निर्णय घेणं हे कठीणच असतं. कारण, त्यात एक 'रिस्क फॅक्टर' असतो, आयुष्याचाच प्रश्न असतो. पण, काही जण हॉटेलमधलं मेन्यू कार्ड पाहूनही गोंधळतात. सुपरमार्केटमध्ये टुथपेस्ट, साबण निवडतानाही त्यांच्या मनाची चलबिचल होते. आजची पिढी कन्फ्यूज आहे, असं म्हटलं जातं ते याच मंडळींमुळे. तुम्हीही त्यापैकी एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगाची नाही. कारण, इंग्लंडमधील (ब्रिस्टल) एक महिला ठाम, स्पष्ट आणि फास्ट निर्णय घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहे. तिनं काय करावं अन् काय करू नये, याबाबत सल्ला देणारा माणूस तिला हवाय आणि त्यासाठी ती दरमहा १ लाख ८५ हजार रुपये (२००० पाउंड) मोजायला तयार आहे.
त्याचं झालंय असं की, या महिलेसाठी गेलं वर्ष अत्यंत वाईट्ट ठरलं. न्यूझीलंडमध्ये फिरायला गेली असताना ती रस्ताच चुकली आणि खिशात पैसेही नसल्यानं अडकून पडली. एका मित्रानं परत करण्याच्या बोलीवर घेतलेले पैसे बुडवले. नातेवाईकांनीही त्रास दिला. हे कमी म्हणून की काय, बॉयफ्रेंडनंही तिला फसवलं. त्यामुळेच, आपण योग्य निर्णय घेऊच शकत नसल्याचं तिला वाटू लागलंय. या कामासाठी एक निर्णयक्षम व्यक्ती नेमण्याचं तिनं ठरवलंय. आपली ओळख जाहीर न करता एका वेबसाईटवर तिनं या पदासाठी जाहिरात दिलीय. अगदी दर आठवड्याला होणाऱ्या गोंधळांना आता मी वैतागलीय. आईही माझी खिल्ली उडवतेय. म्हणूनच, मी कुणासोबत डेटिंग करावं आणि पैसे कुठे खर्च करावेत हे अचूक सांगणारा सल्लागार हवा आहे, असं तिनं म्हटलंय.
सुरुवातीला एका महिन्यासाठी हा सल्लागार नेमायचं महिलेनं ठरवलंय. या व्यक्तीनं सोबत राहून योग्य निर्णय घेण्यास मदत करावी, अशी तिची इच्छा आहे. त्याचा जर फायदा झाला तर ती 'एक्स्टेंशन'ही देऊ शकते. आता 'निर्णय' तुम्हाला घ्यायचाय!
वाह रे नशीब! ८५० रूपयांना घेतलेली अंगठी विकायला गेली होती महिला आणि... https://t.co/ohaxqbav6x
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 9, 2019