नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांती. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून सर्वांशी प्रेमान बोलून तिळगुळाने सर्वांच तोंड गोड करतात. प्रत्येक वर्षाच्या १४ किंवा १५ जानेवारीला नित्य नेमाने मकर संक्रात येते. मकर संक्रांत म्हणजे सुर्याचे उत्तरायण सुरु होणं. सुर्याचा मकर राशीत संक्रमण. भारत विविधतेने नटलेला देश आहे असे आपण नेहमीच ऐकतो. अशातच या सणाबाबतही भारतामध्ये विविधता दिसून येते. मकर संक्रांतीचा दिवस संपूर्ण भारत खंडात वेगवेगळ्या नावाने साजरा करण्यात येतो. लोहडी, बिहु, पोंगल आणि अनेक नावं या सणाला दिलेली आहेत.  मकरसंक्रांत या वर्षी उद्या म्हणजेच १५ जानेवारीला आहे.  

मकरसंक्रांतीचा शुभमुहूर्त

मकरसंक्रांतीच्या तिथीनुसार वेळ १४ जानेवारीच्या मध्यरात्री  २ वाजून ७ मिनिटांनी सुरू होणार आहे. संक्रांतीचा शुभ मुहुर्त  सकाळी १५ जानेवारी सकाळी ७ वाजून १९ मिनिटांपासून ते २ वाजून  ७ मिनिटांपर्यंत आहे. हा सण एकूण तीन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी असते. दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसतात. सर्वांच्या घरी तिळाच्या लाडूंची रेलचेल असते. संक्रांत साजरी करण्यामागील भौगोलिक कारण म्हणजे, सुर्याचा उत्तरेकडील प्रवास. या दिवशी उत्तरायणाला सुरुवात होते. तसेच हिवाळा कमी होऊन थंडीही कमी होते. तसेच दिवस मोठा होऊन रात्री छोटी होत जाते. या दिवशी काळ्या कपड्यांना फार महत्त्व असते. 


काळ्या कपड्यांचे महत्त्व

संक्रांतीच्या दिवशी काळ्या कपड्यांना फार महत्त्व देण्यात येते. विशेषतः नववधू आणि लहान मुलं यांच्यासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी काळे कपडे परिधान करण्यामागे असं कारण सांगितलं जातं की, ही वस्त्र उष्णता शोषून घेऊन शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे संक्रांत जवळ आली की बाजारांमध्ये काळ्या साड्या आणि काळी झबली दिसू लागतात. 

नववधूंसाठी या सणाचे विशेष महत्व देण्यात येते. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीला नववधूसाठी खास काळ्या रंगाची साडी घेण्यात येते. तसेच तिला हलव्याचे दागिने परिधान करण्यास सांगितले जाते. या दिवशी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावण्यात येतं. त्यांना तिळगुळ किंवा तिळाच्या वड्या दिल्या जातात. तसेच एखादी वस्तूही वाण म्हणून देण्यात येते. तसं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानलं जातं. परंतु काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांती होय. 

लहान मुलांचे 'बोर न्हाण'

संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे 'बोर न्हाण' करण्यात येते. यावेळी एका पाटावर बाळाला बसवलं जातं. त्याच्याभोवती इतर लहान मुलांना बसवलं जातं. त्याला काळ झबलं, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, हातात बासरी अशा अनेक प्रकारच्या दागिन्यांनी सजवलं जातं. त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या मुलांना आवडणार्‍या पदार्थांचा अभिषेक करण्यात येतो. 

Image result for makar sankranti 2020

पतंगोत्सव

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागील उद्दीष्ट म्हणजे, सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानामध्ये जातो. त्यामुळे कोवळ्या उन्हामध्ये जाता येते.  

Web Title: Makar sankranti special: why do people wear black cloths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.