अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 07:40 IST2025-04-23T07:40:13+5:302025-04-23T07:40:50+5:30
सेऊलमध्ये शिकायला येणारे परदेशी विद्यार्थी राहण्यासाठी या गोशिवॉनला पसंती देतात. शैक्षणिक सत्र सुरू झाल्या झाल्या येथील सर्व गोशिवॉन विद्यार्थ्यांनी भरून जातात. पण लिडिया मात्र याबाबतीत सुदैवी ठरली.

अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
घर विकत घ्यायचं असो किंवा भाड्याने, ते घेताना जागा किती मोठी आहे, खोल्या प्रशस्त आहेत की नाही, आपलं सगळं सामान त्यात व्यवस्थित मावेल की नाही याची काळजी असते. मनासारखं घर परवडत नसलं की, माणसे नाखुशीने त्या जागेशी तडजोड करून राहतात. पण लिडिया रोका या २७ वर्षीय तरुणीला विचारा छोट्या घरात 'आनंदा'ने राहण्याचं सिक्रेट ! अवघ्या ७७ चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या लिडियाला तिचं घर कितीही छोटं असलं तरी मनापासून आवडतं. तिला तिची खोली म्हणजे जगातली सर्वात सुंदर जागा वाटते. कारण त्या इवल्याशा खोलीने तिच्या जीवनातला संघर्ष संपवला.
लिडियाने जर्मनीतील फ्रैंकफर्ट येथे शिकून पदवी मिळवली. पुढे बिझिनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी ती दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये आली. गेल्या अडीच वर्षांपासून ती इथे राहते. तिने सहावेळा घर बदललं. पण सहाव्या घराने तिला कसं जगायला हवं, याची दिशा दाखवली. लिडिया आत्ता जिथे राहते ती भाड्याची जागा आहे. ८ बाय ९ फुटांची छोटीशी खोलीच. दक्षिण कोरियात अशा छोट्या घरांना 'गोशिवॉन' म्हणतात. एक पलंग, एक छोटं टेबल, एक खुर्ची, मांडणी, छोटुसा फ्रीज आणि छोटं शौचालय एवढाच या गोशिवॉनचा आवाका. सेऊलमध्ये राहणाऱ्या लिडियासारख्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी ही जगण्यातला सुकून अनुभवण्याची जागा आहे.
या घरात राहायला येणं हे लिडियासाठी सोप्प नव्हतं. जागेच्या अभावामुळे लिडियाने आपल्याकडचं बरंच सामान अनिच्छेनेच काढलं. पण आत्ता मात्र कमीतकमी गोष्टींमध्ये आनंदाने जगणं ही लिडियाची जीवनशैली झाली आहे. लिडिया या घरात राहायला येण्यापूर्वी काही मिनिमलिस्ट विचारसरणीची नव्हती. पण आत्ता मात्र ती मिनिमलिझमच्या प्रेमात पडली आहे. आपल्या गरजा आणि हाव यातला फरक तिला कळू लागला आहे.
सेऊलमध्ये शिकायला येणारे परदेशी विद्यार्थी राहण्यासाठी या गोशिवॉनला पसंती देतात. शैक्षणिक सत्र सुरू झाल्या झाल्या येथील सर्व गोशिवॉन विद्यार्थ्यांनी भरून जातात. पण लिडिया मात्र याबाबतीत सुदैवी ठरली. तिला सत्राच्या मध्यात येऊनही राहण्यासाठी गोशिवॉन मिळालं. ७२ चौरस फुटांच्या खोलीत राहण्यासाठी लिडियाने आपल्या गरजा अगदीच मर्यादित केल्या. कमीतकमी वस्तू तिच्या खोलीत सहज बसू शकल्या. आपल्याकडच्या अनेक वस्तू तिने गरजूंना देऊन टाकल्या. तेव्हा तिला समजलं की, आपण कितीतरी वस्तू नुसत्याच घेत राहतो. खरं तर आपल्याला जगण्यासाठी खूप नाही तर फारच मर्यादित गोष्टींची गरज असते. या जागेचं ३२८ डॉलर्स मासिक भाडं मोजणारी लिडिया गोशिवॉनमध्ये राहताना सामूहिक स्वयंपाकघर आणि सामूहिक कपडे धुण्याची जागा वापरते.
खोली छोटी असली तरी लिडियाला ती फारच आरामदायक आणि तिच्या गरजांना अनुरूप वाटते. घरी आलं की, तिला रेशीम किड्याच्या मऊ मऊ कोशात शिरल्यासारखं वाटतं. तिचा अख्खा दिवस कॉलेज, मग अर्धवेळ नोकरीत जातो. घरी ती फक्त झोपण्यासाठी आणि आरामासाठी येते. पण जेवढा वेळ ती तिच्या इवल्याशा खोलीत असते, खुश असते. गुलाबी, जांभळ्या रंगाने सजवलेल्या आपल्या खोलीत लिडिया तडजोड करून नाही तर आनंदाने राहते. या छोट्याशा जागेने तिची जगण्याकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे.