कोणतीही कंपनी जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवर ठेवते तेव्हा आपल्या बजेटनुसार त्यांचं वेतन ठरवत असते. त्यासोबतच पगारात वाढ म्हणजेच इन्क्रीमेंटही कंपनी आपल्या हिशोबाने करते. मात्र, जर एखादी कंपनी अशी असेल जिथे तुम्हाला तुमचा पगार ठरवण्याची आणि वाढवण्याची संधी मिळाली तर... लंडनमध्ये एक अशी कंपनी आहे. जिथे काम करणारे कर्मचारी स्वत: आपला पगार ठरवतात आणि मनात येईल तेव्हा स्वत:चा पगार वाढवूनही घेतात.
या कंपनीचं नाव आहे ग्रांटट्री. ही कंपनी इतर कंपन्यांना सरकारी फंड मिळवून देण्यात मदत करते. या कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने स्वत:च तिचा पगार वाढवून घेतला. आधी तिचा पगार हा साधारण २७ लाख रूपये इतका होता. आता तिने पगार वाढवून घेतल्यावर तिचा पगार ३३ लाख रूपये वर्षाला इतका झाला आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, २५ वर्षीय सीसिलिया मंडुकाने तिच्या पगारात सहा लाख रूपये वर्षाला वाढ केली आहे. याबाबत तिच्या मनात अनेक प्रश्न होते, पण तिचं मत होतं की, तिचा काम आता खूप बदललं आहे. आणि ती तिच्या टार्गेटच्याही खूप पुढे निघून गेली आहे. त्यामुळे तिने तिचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला.
ग्रांटट्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पगार वाढवण्याआधी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करावी लागते. सीसिलिलानेही असंच केलं. तिच्या सहकाऱ्यांनी तिच्या पगार वाढवून घेण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रांटट्री कंपनीमध्ये साधारण ४५ कर्मचारी काम करतात आणि सर्वच कर्मचारी स्वत:चा पगार स्वत:च ठरवतात. इतकेच नाही तर त्यांना हवा तेव्हा त्यात बदल करून घेतात. मात्र, आपला पगार वाढवून घेण्याआधी ते हे बघतात की, त्याच कामासाठी इतर कर्मचाऱ्याना किती पगार मिळतो आहे. त्यासोबतच ते यावरही विचार करतात की, त्यांच्या कामानुसार त्यांना आणखी किती पैसा कंपनीकडून घ्यायला हवा.