आठ किलोमीटर खोल समुद्रात अडकलेली म्हैस, मच्छीमारांनी केले तब्बल ७ तास प्रयत्न पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 16:50 IST2022-01-14T16:49:38+5:302022-01-14T16:50:02+5:30
किनाऱ्यापासून सुमारे आठ किलोमीटर आत काहीतरी पाण्यावर तरंगत असल्याचं त्यांना जाणवलं. थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर ही एक म्हैस असल्याचं त्यांना समजलं. यानंतर मच्छिमारांनी माणुसकी दाखवत या म्हशीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

आठ किलोमीटर खोल समुद्रात अडकलेली म्हैस, मच्छीमारांनी केले तब्बल ७ तास प्रयत्न पण...
केरळच्या कोझीकोडमधील कोठी येथे समुद्रात उतरलेल्या ३ मच्छिमारांना गुरुवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास खोल समुद्रात काहीतरी वेगळंच दृश्य दिसलं. किनाऱ्यापासून सुमारे आठ किलोमीटर आत काहीतरी पाण्यावर तरंगत असल्याचं त्यांना जाणवलं. थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर ही एक म्हैस असल्याचं त्यांना समजलं. यानंतर मच्छिमारांनी माणुसकी दाखवत या म्हशीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले (Fishermen Rescue Buffalo).
दोन तासाच्या प्रयत्नानंतर या प्राण्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात मच्छिमारांना यश आलं. यानंतर मच्छिमारांनी म्हशीला तिच्या मालकाच्या हवाली केलं. या घटनेबाबत माहिती देताना मच्छिमार ए टी फिरोज यांनी सांगितलं की रात्रीच्या वेळी आम्हाला समुद्रातून अजब आवाज येत होते. यानंतर आम्ही बॅटरीच्या मदतीने प्रकाश करत आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर आम्हाला एक म्हैस पाण्यावर तरंगताना दिसली. म्हैस अतिशय थकली होती. फिरोज यांनी सांगितलं, की 'पाण्यात म्हशीला पाहून आम्ही आमचं हातातील काम सोडलं आणि म्हशीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. फिरोज यांच्यासोबत यावेळी ए टी झाकीर आणि टी पी पुवाद हेदेखील होते. तिघांनी मिळून अथक प्रयत्नांनंतर म्हशीचा जीव वाचवला'.
पुढे बोलताना फिरोज यांनी म्हटलं की 'ही म्हैस समुद्रात इतक्या खोलवर कशी गेली, याची काहीही कल्पना नाही. कामादरम्यान अशा प्राण्याला समुद्रात पाहाणं, हा आमच्यासाठीही पहिलाच अनुभव होता. या म्हशीला खेचून आमच्या बोटीपर्यंत आणणंदेखील खूप कठीण होतं. त्यामुळे आम्ही आणखी एक बोट तिथे आणली. यानंतर म्हशीला दोन प्लॅस्टिक कॅन बांधले, जेणेकरून ती वाहून जाऊ नये आणि सकाळी आठ वाजेपर्यंत तिला किनाऱ्यावर आणलं.'