वाह रे नशीब! आधी लागली ६ कोटी रूपयांची लॉटरी, नंतर शेतात सापडला मोठा 'खजिना'....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 13:18 IST2019-12-09T13:16:07+5:302019-12-09T13:18:54+5:30
नशीबाला मानत असालच....पण मानत असालही तरी कुणाचं ना कुणाचं नशीब चमकल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील.

वाह रे नशीब! आधी लागली ६ कोटी रूपयांची लॉटरी, नंतर शेतात सापडला मोठा 'खजिना'....
(सांकेतिक फोटो)
नशीबाला मानत असालच....पण मानत असालही तरी कुणाचं ना कुणाचं नशीब चमकल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एक नशीबाने आयुष्य बदललेल्या एका व्यक्तीची घटना समोर आली आहे केरळमधील ६६ वर्षीय बी.रत्नाकर पिल्लई यांच्यासोबत ही घटना घडली. पिल्लई यांना गेल्यवर्षी ख्रिसमस लॉटरीमध्ये ६ कोटी रूपयांची लॉटरी लागली होती. या पैशातून त्यांनी तिरूअनंतपुरमपासून थोड्या अंतरावर असलेल्या किलिमनूरमध्ये शेती खरेदी केली. आता या शेतानेही त्यांना एक मोठं गिफ्ट दिलंय.
१०० वर्ष जुना खजिना
पिल्लई त्यांच्या शेतात बीटाचं पिक घेतात. शेतात काम करत असताना त्यांना एक मडकं सापडलं. या मडक्यात नाणी होती. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, २ हजार ५९५ नाण्यांची भरलेलं हे मडकं १०० वर्ष जुनं आहे. या नाण्यांचं वजन २० किलो ४० ग्रॅम इतकं भरलं. ही सर्व नाणी तांब्याची असून ही नाणी त्रावणकोर साम्राज्यातील असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र, अजून या नाण्यांची किंमत समजू शकली नाही. सध्या ही नाणी लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत. ही नाणी स्वच्छ केल्यावर यांची किंमत तज्ज्ञांकडून जाणून घेतली जाईल.
असे सांगितले जात आहे की, ही नाणी त्रावणकोरमधील दोन राजांच्या शासन काळात वापरली जात होती. यातील पहिला मूलम थिरूनल राम वर्मा हा होता. त्यांचा शासन काळ १८८५ ते १९२४ दरम्यान होता. तर दुसरे राजा चिथिरा थिरूनल बाला राम वर्मा हे होते. हे त्रावणकोरचे शेवटचे शासक होते. त्यांनी १९२४ ते १९४९ दरम्यान शासन चालवलं.