दुर्मिळ! घराच्या अंगणात सापडला हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेला 'मास्टोडॉन'चा जबडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:34 IST2024-12-19T19:33:16+5:302024-12-19T19:34:22+5:30
Mastodon Jaw Fossil: एवढा मोठा जबडा पाहून घराचा मालक चक्रावून गेला.

दुर्मिळ! घराच्या अंगणात सापडला हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेला 'मास्टोडॉन'चा जबडा
Mastodon Jaw Fossil Discovery: जगभरातील अनेक ठिकाणी प्रागैतिहासिक काळातील प्राण्यांची जीवाश्म आढळली आहेत. अशाच प्रकारची घटना अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये घडली आहे. एका व्यक्तीला त्याच्या घराच्या अंगणात 'मास्टोडॉन'(Mastodon), या प्राण्याचा जबडा सापडला आहे. बागकाम करताना हे दुर्मिळ जीवाश्म त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्याने तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.
सविस्तर माहिती अशी की, सप्टेंबर 2024 मध्ये न्यूयॉर्कमधील एक व्यक्ती आपल्या घराच्या अंगणात बागकाम करत होता. यावेळी त्याला जमिनीत दातांसारखे काहीतरी आढळले. त्याने खोलवर खोदले असता, एक भलामोठा जबडा आणि इतर काही हाडांचे तुकडे आढळले. माहिती मिळताच, न्यू यॉर्क विद्यापीठातील संग्रहालय कर्मचारी आणि संशोधकांनी या ठिकाणी उत्खनन केले. यावेळी त्यांना मास्टोडॉनचा संपूर्ण जबडा, तसेच पायाचे आणि बरगडीचे हाड सापडले.
संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मास्टोडॉन हा हत्तीसारखा दिसणारा प्राणी असून, आताच्या हत्तीपेक्षा आकाराने खूप मोठा होता. राज्यात आतापर्यंत मास्टोडॉनचे 150 हून अधिक जीवाश्म सापडले असून, त्यापैकी सुमारे एक तृतीयांश ऑरेंज काउंटीच्या त्याच भागात आढळले आहेत.
मास्टोडॉन 11000 हजार वर्षांपूर्वी नामशेष झाला
मास्टोडॉन हा एक विशाल हत्तीसारखा सस्तन प्राणी होता, जो सुमारे 11,000 वर्षांपूर्वी नामशेष झाला. हा आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य अमेरिकेत राहायचा. मास्टोडॉन जातीची सर्वात जुनी हाडे काँगो (आफ्रिका) मध्ये सापडली असून, ती अंदाजे 40 मिलियन वर्षे जुनी आहेत.