माणसाने अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला, पण सर्वात 'फायदेशीर' शोध कोणता असेल तर तो म्हणजे— शिव्या! ऑफिसमध्ये बॉसवर आलेला राग असो किंवा रहदारीत अंगावर येणारा रिक्षावाला, 'तो' एक शब्द तोंडातून बाहेर पडला की जे समाधान मिळतं, त्याला विज्ञानात 'कॅथार्सिस' म्हणतात आणि आपल्या भाषेत 'विष उतरलं' म्हणतात! शिवी च्या उलट काय, तर विष! यावरूनच हा शब्द अस्तित्त्वात आला असावा का? जाणून घेऊ.
शिव्यांची निर्मिती: मेंदूचे विज्ञान काय सांगते?
तज्ज्ञांच्या मते, भाषा आणि शिव्यांची निर्मिती एकाच वेळी झाली असावी. विज्ञानानुसार, सामान्य भाषा मेंदूच्या 'लेफ्ट हेमिस्फीअर'मध्ये तयार होते, परंतु शिव्या मेंदूच्या 'लिंबिक सिस्टम' (Limbic System) मधून येतात. हा भाग आपल्या भावना, राग आणि संघर्षाशी संबंधित असतो. शिवी म्हणजे केवळ अपशब्द नसून तो समोरच्याला दुखावण्यासाठी किंवा त्याचा मानभंग करण्यासाठी वापरलेला एक 'शाब्दिक प्रहार' असतो.
१. सुरुवात कशी झाली असावी?
तज्ज्ञ म्हणतात भाषा आली तेव्हाच शिव्या आल्या. विचार करा, आदिमानवाने एखाद्याला विचारलं असेल, "भावा, शिकार कुठेय?" आणि समोरच्याने दुर्लक्ष केलं असेल, तेव्हा चिडून आदिमानवाच्या तोंडून जो पहिला 'राग' बाहेर पडला असेल, तीच असेल जगातील पहिली शिवी! पुढे माणसाने प्रगती केली आणि या रागाला व्याकरणाची जोड देऊन शब्द तयार झाले, रूढ झाले आणि तिलाच शिवी अशी ओळख मिळाली असावी.
२. संस्कृत: जिथे शिव्याही 'शुद्ध' होत्या!
प्राचीन काळी लोक खूपच सभ्य होते. पद्मश्री उषा किरण सांगतात की संस्कृतमध्ये आजच्यासारख्या अश्लील शिव्या नव्हत्याच. तेव्हा कोणाला 'कृपण' (कंजूस) किंवा 'दुष्ट' म्हणणं ही सर्वात मोठी शिवी होती. विचार करा, आजच्या काळात जर कोणी रागात येऊन म्हटलं, "हे दुष्टा, तू फारच कृपण आहेस!" तर समोरचा माणूस चिडण्याऐवजी डिक्शनरी घेऊन अर्थ शोधत बसेल!
३. मराठी शिव्या: कोल्हापुरी ठसका ते कोकणी गोडवा!
मराठी भाषेतील शिव्यांचं वैभव तर विचारायलाच नको!
पश्चिम महाराष्ट्र: इथल्या शिव्यांमध्ये 'कोल्हापुरी लवंगी मिरची'चा ठसका असतो. समोरच्याला शिवी लागली की नाही, यापेक्षा ती ऐकणाऱ्याला 'झणझणीत' वाटली पाहिजे, याकडे जास्त कल असतो.
कोकण: इथल्या शिव्यांमध्ये एक प्रकारची 'लय' असते. माणूस रागात असला तरी त्याच्या शिव्या ऐकायला गोड वाटतात.
भकार शब्द: काही शिव्या 'भ' अक्षरावरून सुरू होतात, म्हणून त्यांना प्रेमाने 'भकार' म्हणतात. हे शब्द जणू काही संवादाचे 'पूर्णविराम' बनले आहेत.
४. शिव्यांमध्ये महिलांचा उल्लेख का? (पुरुषी 'इगो'!)
प्राचीन काळी राजे-महाराजे युद्ध जिंकायचे आणि मुलींना पळवून न्यायचे. तिथूनच 'स्त्रीचं अस्तित्त्व प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलं' मग काय? कोणाचा अपमान करायचा असेल, तर त्याच्या घरातील स्त्रीबद्दल बोलायचं, ही वाईट प्रथा सुरू झाली. खरंतर, यात शिवी देणाऱ्याचा अहंकार जास्त आणि समोरच्याचा स्वाभिमान(जिव्हाळ्याची व्यक्ती) दुखावणं हा हेतू साध्य होऊ लागला.
५. शिव्यांचे काही 'अजब' फायदे :
१. तणावमुक्ती: रागाच्या भरात एखादी शिवी दिल्यास रक्तदाब थोडा कमी होतो असं विज्ञान म्हणतं (पण समोरचा मारणार नसेल तरच!). २. मैत्रीचं लक्षण: महाराष्ट्रात तर मित्र एकमेकांना शिवी दिल्याशिवाय बोलतच नाहीत. हाच ट्रेंड वेबसिरीजमध्येही दिसतो. "काय रे... (शिवी), कुठे होतास?" ही विचारपूस म्हणजे प्रेमळ संवाद मानला जातो.
६. शिव्या देण्याचा 'ऑफिशिअल' दिवस :
बरोबर ओळखलंत! होळी! एखाद्याच्या नावाने बोंबा मारणे आणि फाल्गुनातल्या या सणाबरोबर जुने वैर विसरून नव्याने नातेसंबंध जोडणे, चैत्राचे अर्थात नव्या वर्षाचे स्वागत करणे, अशी सोयआपल्या पूर्वजांनी करून ठेवली होती. त्यामुळे हे औचित्य साधून लोक मन मोकळं करून घेत असत. आहे की नाही मजेशीर?
Web Summary : Swearing, linked to emotions and catharsis, may have originated with language itself. From polite Sanskrit insults to regional Marathi variations and the misuse of female references, swearing serves purposes like stress relief and bonding, culminating in cathartic traditions like Holi.
Web Summary : गाली, भावनाओं और विरेचन से जुड़ी, भाषा के साथ ही उत्पन्न हुई होगी। विनम्र संस्कृत अपमानों से लेकर क्षेत्रीय मराठी विविधताओं और महिला संदर्भों के दुरुपयोग तक, गाली तनाव से राहत और बंधन जैसे उद्देश्यों को पूरा करती है, जिसका समापन होली जैसी विरेचन परंपराओं में होता है।