ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:03 IST2025-09-03T17:03:21+5:302025-09-03T17:03:43+5:30
आजवर आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी चोरीला गेल्याचं ऐकलं असेल, पण कधी एखादा तलाव चोरीला गेल्याचे ऐकले आहे का?

ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
आजवर आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी चोरीला गेल्याचं ऐकलं असेल, पण कधी एखादा तलाव चोरीला गेल्याचे ऐकले आहे का? मध्यप्रदेशच्या रीवामधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागातील एक तलाव चोरीला गेला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती समोर आली आहे. आता गावकरी या तलावाचा शोध घेत होते. इतकंच काय तर त्यांनी पोलिसांकडेही धाव घेतली होती. मात्र. पोलिसांनाही यात फारशी मदत करता आली नाही. अखेर आता हा तलाव शोधून देणाऱ्या व्यक्तीला मोठं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. हे प्रकरण समोर येताच आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
रीवा परिसरातील चकघाटमधून ही घटना समोर आली आहे. या परिसरात 'अमृत सरोवर'सह आणखी काही तलाव एका रात्रीत गायब झाले आहेत. गायब झालेले तलाव शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळीकडे धाव घेतली. परंतु, ही समस्या अद्याप सुटलेली नाही. आता गावकरी गावात ढोल वाजवून तलाव शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्याची घोषणा करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२३ रोजी २४.९४ लाख रुपये खर्चून अमृत सरोवर तलाव बांधण्यात आला होता. तो पूर्वा मणिराममधील कथौली नावाच्या गावात बांधण्यात आला होता. महसूल नोंदीनुसार जमीन क्रमांक ११७मध्ये याची नोंद देखील आहे. मात्र, या जागेवर कोणत्याही प्रकारचा सरोवर किंवा तलाव बांधण्यात आलेलाच नाही.
ग्रामपंचायत सरपंचाने त्यांच्या स्वतःच्या खाजगी जमिनीतील क्षेत्र क्रमांक १२२ मध्ये नाल्यावर बांध बांधून पाणी जमा केले होते. पाणी जमा होताच तिथे तलाव बांधल्याचे दाखवून २४ लाख ९४ हजार रुपयांची अफरातफर केली. तक्रार मिळाल्यानंतर जिल्हा पंचायत रीवाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गाव पंचायतीने बांधलेल्या अमृत सरोवर तलावाची संपूर्ण रक्कम एका आठवड्यात वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. गावकऱ्यांच्या सजगतेमुळे आणि हटके प्रकारे तक्रारीमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.