डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 08:49 IST2025-12-26T08:49:02+5:302025-12-26T08:49:13+5:30
एखाद्या फूड डिलिव्हरी बॉयनं रोज किती तास काम करावं, रोज बाइकनं किती किलोमीटर प्रवास करावा आणि आपल्या गरजा कमीतकमी ...

डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
एखाद्या फूड डिलिव्हरी बॉयनं रोज किती तास काम करावं, रोज बाइकनं किती किलोमीटर प्रवास करावा आणि आपल्या गरजा कमीतकमी करत किती पैसे वाचवावेत? चीनमध्ये फूड डिलिव्हरीचं काम करणारा २५ वर्षीय झांग झुएच्यांग हा तरुण गेल्या पाच वर्षांपासून रोज किमान १३ ते १४ तास काम करतोय, आपल्या जीवनावश्यक खर्चातही जेवढी बचत आणि कपात करता येईल तेवढी करत आतापर्यंत तब्बल १.४२ कोटी रुपये त्यानं वाचवलेत आणि ग्राहकांपर्यंत फूड डिलिव्हरी देण्यासाठी बाइकवर आतापर्यंत सुमारे ३,२४,००० किलोमीटर अंतर त्यानं पार केलं आहे. कामाचा वेग आणि कार्यक्षमतेमुळे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या समर्पणाची दखल घेतली असून, त्याला ‘ग्रेट गॉड’ आणि ‘ऑर्डर किंग’ अशी नावं दिली आहेत.
झांगनं २०२० मध्ये शांघायमध्ये एका फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी काम करायला सुरुवात केली. तो दर महिन्याला लांबलांबच्या ३००हून अधिक ऑर्डर पूर्ण करतो. वाचलेल्या आणि वाचवलेल्या या पैशांतून पुढील वर्षी शांघायमध्ये नाश्त्याची दुकानं उघडण्याचा विचार तो करतो आहे.
झांगनं अवघ्या पाच वर्षांत १.१२ मिलियन युआन म्हणजेच सुमारे १.४२ कोटी रुपये वाचवलेत. यासाठी आठवड्याचे सातही दिवस तो काम करतो. केवळ अत्यावश्यक गरजांवरच तो फक्त खर्च करतो. झांग झुएच्यांगचं झांगझोऊ शहरातलं नाश्त्याचं दुकान बंद पडलं होतं. त्यानंतर २०२० मध्ये तो शांघायला गेला. या अपयशी व्यवसायामुळे त्याच्यावर ५० हजार युआन म्हणजेच सुमारे ६.३७ लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. नव्यानं सुरुवात करण्याच्या इराद्यानं झांगनं शांघायमध्ये एका मोठ्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी काम सुरू केलं.
पाच वर्षांनंतर त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात त्यानं सांगितलं की डिलिव्हरी रायडर म्हणून काम करताना त्यानं एकूण १.४ मिलियन युआन म्हणजेच सुमारे १.७८ कोटी रुपये कमावले. कर्ज फेडून आणि राहण्याचा खर्च भागवूनही झांग १.१२ मिलियन युआन वाचवण्यात यशस्वी ठरला.
झांग सांगतो, रोजच्या अत्यावश्यक गरजांखेरीज माझा दुसरा कुठलाही खर्च नाही. खाणं आणि झोपणं याखेरीज माझा सगळा वेळ ग्राहकांपर्यंत जेवण पोहोचवण्यात जातो.
झांगचं शेड्युल खूपच व्यस्त आहे. तो दररोज सकाळी १०.३० पासून रात्री १ वाजेपर्यंत काम करतो. चायनीज स्प्रिंग फेस्टिव्हलच्या सुट्ट्यांमध्येच तो काही दिवसांची रजा घेतो. रोज इतकं प्रचंड काम आणि प्रवास करीत असल्यामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढू नयेत यासाठी झांग विश्रांतीला प्राधान्य देतो आणि दररोज सुमारे साडेआठ तास झोप घेतो. जेवण आणि झोप याव्यतिरिक्त त्याचा रोजचा सगळा वेळ ग्राहकांना फक्त डिलिव्हरी देण्यातच जातो. प्रत्येक डिलिव्हरीसाठी साधारण २५ मिनिटं लागतात.
झांग म्हणतो, कामाचा कंटाळा न करता त्यात आनंद मानणं आणि ग्राहकांना संतुष्ट राखणं यावरच माझा भर असतो. त्यातून ग्राहकांना आणि मलाही आनंद मिळतो. इतकी मेहनत केल्यानंतर भविष्याचं नियोजनही त्यानं करून ठेवलं आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत शांघायमध्ये नाश्त्याची दोन दुकानं उघडण्याचा त्याचा प्लॅन आहे. त्यासाठी ८ लाख युआन तो गुंतवणार आहे.