अंड्याबाहेर येताच 'राजकुमार'ला का मिळाली Z+ सुरक्षा?; ५० जवान अन् अत्याधुनिक दुर्बिणी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:25 IST2026-04-01T20:24:54+5:302026-04-01T20:25:52+5:30
या चिमुकल्या पिल्लाच्या संरक्षणासाठी ५० हून अधिक वन कर्मचारी तैनात करण्यात आले असून ते तीन शिफ्टमध्ये रात्रंदिवस काम करत आहेत.

अंड्याबाहेर येताच 'राजकुमार'ला का मिळाली Z+ सुरक्षा?; ५० जवान अन् अत्याधुनिक दुर्बिणी सज्ज
कच्छच्या रखरखत्या उन्हात एका छोट्याशा पिल्लाने जन्म घेतला आहे, ज्याचा चिवचिवाट ऐकण्यासाठी ५० जवानांनी दिवस-रात्र पहारा दिला. गुजरातच्या कच्छमध्ये या चिमुकल्याच्या स्वागतासाठी अशी तयारी करण्यात आलीय जी एखाद्या बड्या नेत्यासाठी असते. १० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जन्मलेल्या ग्रेट इंडियन बस्टर्डच्या पिल्लाच्या सुरक्षेसाठी ५० जवान गस्त घालत आहेत. अखेर हा पक्षी इतका खास का आहे की त्याच्यासाठी रस्तेसुद्धा बंद करण्यात आले? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
सध्या गुजरातच्या कच्छमध्ये एक चिमुकले पिल्लू चर्चेत आहे. हा काही साधासुधा पक्षी नाही तर जगातील सर्वात दुर्मिळ प्रजातींपैकी एक असलेल्या 'ग्रेट इंडियन बस्टर्ड'चे(माळढोक) पिल्लू आहे. २६ मार्च २०२६ रोजी त्याच्या जन्मानंतर वन विभागाने त्याला 'राजकुमार' असा दर्जा दिला आहे. दहा वर्षांनंतर गुजरातमध्ये या पक्ष्याची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
५० जवान आणि २४/७ अत्याधुनिक देखरेख
या चिमुकल्या पिल्लाच्या संरक्षणासाठी ५० हून अधिक वन कर्मचारी तैनात करण्यात आले असून ते तीन शिफ्टमध्ये रात्रंदिवस काम करत आहेत. आजूबाजूचा परिसर 'नो-मॅन्स लँड'म्हणून घोषित करण्यात आला असून इथं नागरिकांच्या हालचालींवर कडक बंदी आहे. दुर्बिणी आणि स्पॉटिंग स्कोपच्या साहाय्याने वॉच टॉवरवरून टेहळणी करत त्याच्या प्रत्येक क्षणावर नजर ठेवली जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पिल्लाबद्दल क्षणाक्षणाचे अपडेट थेट गांधीनगर आणि अहमदाबाद येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले जात आहेत.
शत्रूपासून वाचण्यासाठी वॉटर प्रूफ चक्रव्यूह
वन विभागाने कुत्रे आणि कोल्ह्यांसारख्या हिंस्र प्राण्यांपासून या पिल्लाचे संरक्षण करण्यासाठी अजब शक्कल लढवली आहे. तहानलेले प्राणी त्यांच्याजवळ येऊ नयेत म्हणून परिसरातील पाण्याचे स्रोत मुद्दामहून कोरडे करण्यात आले आहेत. तुटलेली कुंपणे दुरुस्त करण्यात आली आहेत आणि गावकऱ्यांना त्यांची गुरे चरण्यास मनाई करण्यात आली आहे. अगदी मादी माळढोक पक्ष्यावरही ट्रॅकिंग टॅग लावून लक्ष ठेवले जात आहे, जेणेकरून धोक्याची कोणतीही चाहूल लागताच काही मिनिटांतच पथके घटनास्थळी पोहोचू शकतील.
दरम्यान, माळढोक पक्ष्याचे हे पिल्लू केवळ वन विभागाच्या अथक परिश्रमाचे फळ नाही तर निसर्गप्रेमींसाठी आशेचा एक नवा किरण आहे. १० वर्षांनंतर आलेल्या या आनंददायी घटनेचे जतन करण्यासाठी संपूर्ण प्रशासन डोळ्यात तेल घालून त्याचे रक्षण करत आहे. जेणेकरून ही दुर्मिळ प्रजाती पुन्हा एकदा आकाशात उंच भरारी घेऊ शकेल.