बॉयफ्रेंडने अचानक फोन उचलणं बंद केलं, तरूणीला वाटलं त्याने दगा दिला, पण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 10:28 IST2024-06-10T10:26:51+5:302024-06-10T10:28:32+5:30
एक दिवस अचानक कोडीने हेलीच्या फोन किंवा मेसेजला उत्तर देणं बंद केलं. हेलीला वाटलं की, कोडीने तिला दगा दिला.

बॉयफ्रेंडने अचानक फोन उचलणं बंद केलं, तरूणीला वाटलं त्याने दगा दिला, पण....
एका कपलची लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. कपल अमेरिकेत राहतं. कोडी ब्राएंट आणि हेली वोलोशेन एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांमध्ये सगळं काही चांगलं सुरू होतं. पण एक दिवस अचानक कोडीने हेलीच्या फोन किंवा मेसेजला उत्तर देणं बंद केलं. हेलीला वाटलं की, कोडीने तिला दगा दिला. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं.
कोडीने फोन उचलणं बद केल्याने हेलीला वाटलं की, त्याने तिला फसवलं आणि दगा दिला. पण तिला नंतर समजलं की, तो कोमात होता. २०२२ मध्ये दोघांची भेट झाली. दोघेही लॉस एंजलिसमध्ये एक किलोमीटरच्या अंतरावर राहतात. त्यांची मैत्री झाली आणि नंतर दोघेही प्रेमात पडले.
कोडीने टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली. तो म्हणाला की, काही आठवडे दोघेही सोबत फिरत होते. पण अचानक असं काही घडलं की, सगळंच बदललं. कोडीने हेलीसोबत अचानक बोलणं बंद केलं.
हेलीला वाटलं की, कोडीने तिला दगा दिला. पण सत्य वेगळंच होतं. सोशल मीडियाचा वापर करत असताना हेलीचं नजर एक दिवस कोडीच्या परिवाराने सुरू केलेल्या GoFundMe पेजवर पडली. तेव्हा तिला समजलं की, कोडीचा अपघात झाला ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि तो कोमात आहे. कोडीला हेलीसोबतच्या नात्याबाबत काहीच आठवत नव्हतं.
तो टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हणाला की, "मुळात मला माझ्या अपघाताआधीच्या नात्याबाबत काहीच आठवत नव्हतं. असं काही होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. पण भावना जाग्या होत होत्या. मला वाटतं तिने मला दुसऱ्यांदा जिंकलं".
कोडीला नंतर वेगवेगळ्या थेरपीमधून जावं लागलं. अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शरीर अजून पूर्णपणे साथ देत नाहीये. हेली आता त्याच्यासोबत असते आणि त्याची मदत करते.