२०० वर्षांआधी रातोरात अचानक या गावातील सगळे लोक झाले होते गायब, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:57 IST2025-01-29T12:57:23+5:302025-01-29T12:57:49+5:30
Ghost Village of India: कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...

२०० वर्षांआधी रातोरात अचानक या गावातील सगळे लोक झाले होते गायब, जाणून घ्या कारण...
Ghost Village of India: राजस्थानचा इतिहास खूप मोठा आहे. येथील किल्ले-महाल आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत राहतात. पण येथील एक गाव वेगळ्याच कारणानं चर्चेत असतं. येथील कुलधरा हे एक असं गाव आहे जिथे एक अजब शांतता आहे. कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...
जयपूरजवळ कुलधरा कधीकाळी पालीवाल ब्राम्हणांचं एक समृद्ध गाव होतं. येथील लोक बुद्धिमान होते आणि त्यांना व्यापाराचं कौशल्य होतं. साधारण २०० वर्षांआदी कुलधरा आणि त्याच्या आजूबाजूच्या गावातील सगळे लोक रातोरात गायब झाले आणि याची त्यांनी काही खूणही सोडली नाही. या गावाच्या कहाणीमध्ये एक स्थानिक शासक सलीम सिंहचा उल्लेख येतो. हा एका पालीवाली ब्राम्हणाच्या मुलीशी बळजबरीनं लग्न करण्याचा प्रयत्न करत होता.
मात्र, गावातील लोकांनी त्याला विरोध केला. असं म्हणतात की, तेव्हा त्यानं गाव नष्ट करण्याची धमकी दिली होती. गावातील लोक त्याच्यासमोर झुकले नाही आणि त्यांनी ठरवलं की, ते गाव सोडून जातील. असं सांगितलं जातं की, ते जाण्याआधी या गावाला शापित करून गेले होते. जेणेकरून तिथे पुन्हा कुणी राहू नये. तेव्हापासून आजपर्यंत हे गाव पुन्हा वसलं नाही.
कुलधराच्या पडक्या घरांनी या गावाला आणखी रहस्यमय बनवलं आहे. इथं कोणतेच प्राणी नाही. जीवन नाही. झाडं नाहीत. फक्त भयान शांतता. काही लोक दावा करतात की, त्यांना इथे एक अजब ऊर्जा जाणवते. तर काही लोक म्हणतात की, हवेत इथे काही आवाजही ऐकायला मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही येथील दगडांच्या संरचना सुरक्षीत आहेत.
अनेक लोक असंही मानतात की, कुलधरातील गायब झालेल्या लोकांची आत्मा अजूनही इथे भटकते. काही लोक दावा करतात की, रात्री इथून काही आवाज येतात. या गावाबाबत अनेक कथा प्रचलित असूनही इथे अनेक पर्यटक भेट देतात. येथील वास्तुकलेचं कौतुक करतात. तर काही लोक इथे वेगळा अनुभव घेण्यासाठी येतात. पण अजूनही या गावातील लोक कुठे गेले हे कुणाला समजू शकलेलं नाही.