राजस्थानच्या चित्तौडगडच्या मेवाड परिसरातील प्रसिद्ध कृष्ण धाम श्री सांवलिया सेठ मंदिराची मासिक दानपेटी उघडण्यात आली असून यातील देणगीची ५ टप्प्यात मोजणी करण्यात आली. मोठ्या संख्येने श्रद्धाळू भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात त्याशिवाय भरभरून दान मंदिराच्या दानपेटीत टाकतात. दानपेटी दान करणाऱ्या रक्कमेचा आकडा सातत्याने वाढत असून मंदिर प्रशासनाकडून नवीन दानपेटी बनवण्याचं काम सुरू आहे.
यंदा दानपेटी उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भेटवस्तू, रोख रक्कम आणि ऑनलाईन देणगी यातून जवळपास २२ कोटी ९२ लाख १३ हजार ३१७ रुपये जमा झाले आहेत. इतकेच नाही तर ६६५ ग्रॅम सोने, १३३ किलो ६५४ ग्रॅम चांदीही मंदिरात देवाला अर्पण करण्यात आली आहे. मासिक दानपेटी २८ जानेवारीला मंदिर प्रशासकीय अधिकारी, मंडल अध्यक्ष आणि सदस्य यांच्या उपस्थित उघडण्यात आली. पहिल्या टप्प्यात ८ कोटी ८ लाख रुपये मोजण्यात आले. त्यानंतर २९ जानेवारीला मौनी अमावस्या असल्याने मोजणी करण्यात आली नाही. दुसऱ्या टप्प्यात ३० जानेवारीला ४ कोटी ५४ लाख ५ हजार मोजले. तिसऱ्या टप्प्यात ३१ जानेवारीला ३ कोटी ७० लाख मोजणी झाली. चौथ्या टप्प्यात एकूण १६ कोटी ३२ लाख ५ हजार रुपये देणगी मोजण्यात आली आहे.
६६५ ग्रॅम सोने, १३३ किलो चांदीही भेट
मोजणीच्या पाचव्या टप्प्यात मंदिरात आलेल्या भेटवस्तू, ऑनलाईन देणगी यांची मोजणी केली. त्यात ५ कोटी ९२ लाख ५३ हजार ४१७ रुपये मिळाले. यामुळे एकूण मिळून मंदिरातील मासिक दानपेटी, भेटवस्तू मिळून २२.९२ कोटी रक्कम जमा झाली. त्याशिवाय सोने-चांदीही मोजली ज्यात ६६५ ग्रॅम सोने आणि १३३ किलो ६५४ ग्रॅम चांदी देणगी म्हणून देवाला अर्पण करण्यात आली.
दरम्यान, मागील महिन्यातही मासिक दानपेटीतून जवळपास २३ कोटी रक्कम जमा करण्यात आली होती. दिवसेंदिवस भाविकांकडून दानपेटीत दिली जाणारं दान वाढत आहे. मंदिर प्रशासनाने या रक्कमेचा योग्य वापर व्हावा यासाठी धार्मिक, विकास आणि सामाजिक कार्यात ही रक्कम गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे.