एकमेव अशी हिऱ्याची खाण जिथे कुणीही शोधू शकतात हिरे, विकूही शकता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 17:23 IST2023-07-24T17:22:00+5:302023-07-24T17:23:54+5:30
जगात एक अशीही हिऱ्याची खाण आहे, जिथे सर्वसामान्य लोक जाऊन हिरे शोधू शकतात. इतकंच नाही तर इथे ज्या व्यक्तीला हिरा मिळेल, तो हिरा त्या व्यक्तीचाच होतो.

एकमेव अशी हिऱ्याची खाण जिथे कुणीही शोधू शकतात हिरे, विकूही शकता!
जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी हिऱ्यांच्या खाणी आहेत. या खाणींमधून शेकडो हिरे काढण्यात आले. या खाणी काही कंपन्यांकडे असतात. तेच हिरे काढतात आणि विकतात. पण जगात एक अशीही हिऱ्याची खाण आहे, जिथे सर्वसामान्य लोक जाऊन हिरे शोधू शकतात. इतकंच नाही तर इथे ज्या व्यक्तीला हिरा मिळेल, तो हिरा त्या व्यक्तीचाच होतो.
ही खाण अमेरिकेच्या अरकान्सास राज्याच्या पाइक काउंटी क्षेऊातील मरफ्रेसबोरोमध्ये आहे. येथील अरकान्सास नॅशनल पार्कमध्ये 37.5 एकराच्या शेतातील जमिनीवरच हिरे सापडतात. इथे 1906 पासून डायमंड मिळणे सुरू झाले, त्यामुळे या ठिकाणाला 'द क्रेटर ऑफ डायमंड्स' असंही म्हटलं जातं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट 1906 मध्ये जॉन हडलेस्टोन नावाच्या एका व्यक्तीला त्याच्या शेतात दोन चमकते दगड मिळाले होते. त्यांनी हे दगड एक्सपर्टला दाखवले तर कळाले की, हे हिरे आहेत. त्यानंतर जॉनने त्याची 243 एकर जमीन एका डायमंड कंपनीला चांगल्या किंमतीत विकली.
1972 मध्ये डायमंड कंपनीने खरेदी केलेली जमीन नॅशनल पार्कमध्ये गेली. त्यानंतर अरकान्सास डिपार्टमेंट ऑफ पार्क अॅन्ड टूरिज्मने जमीन डायमंड कंपनीकडून खरेदी केली आणि हे ठिकाण सर्वसामान्य लोकांसाठी खुलं केलं. मात्र, या खाणीत सर्वसामान्य लोकांना हिरे शोधण्यासाठी नाममात्र फी द्यावी लागते.
या शेतातून लोकांना आतापर्यंत हजारो डायमंड मिळाले आहेत. नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनुसार, 1972 पासून आतापर्यंत या जमिनीवर 30 हजारांपेक्षा अधिक हिरे मिळाले आहेत. 'अंकल सेम' नावाचा हिरा याच जमिनीत मिळाला होता. हा हिरा 40 कॅरेटचा होता. हा अमेरिकेत मिळालेला सर्वात मोठा हिरा आहे.
इथे सापडणारे हिरे सामान्यपणे छोट्या आकाराचे असतात. चार ते पाच कॅरेटचे हिरे इथे अधिक सापडतात. इथे लोक मोठ्या संख्येने हिरे शोधण्यासाठी येतात. यात आता ज्याचं नशीब चांगलं त्याला हिरे सापडतात तर काहींना हाती काहीच लागत नाही.