चमत्कार! मान कापल्यानंतरही एक आठवड्यापासून जिवंत आहे ही कोंबडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 16:30 IST2018-03-29T16:19:48+5:302018-03-29T16:30:38+5:30
आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोंबडी या उपचारांना व्यवस्थितपणे प्रतिसादही देत आहे.

चमत्कार! मान कापल्यानंतरही एक आठवड्यापासून जिवंत आहे ही कोंबडी
बँकॉक: आजपर्यंत आपण असाध्य आजारावर किंवा दुर्मिळ व्यंगावर मात करून जगणाऱ्या माणसांच्या अनेक कथा ऐकल्या असतील. साहजिकच अशा लोकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे कौतुकही केले जाते. मात्र, थायलंडमधील एक घटना ऐकून तुम्ही आर्श्चयचकित झाल्यावाचून राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थायलंडमधील एक कोंबडी या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, अर्थात त्याचे कारणही तसेच आहे.
या कोंबडीची मान कापली जाऊनही ती गेल्या आठवडाभरापासून जिवंत आहे. हा एक प्रकारचा चमत्कारच म्हणायला हवा. मान नसूनही ही कोंबडी इकडेतिकडे फिरत होती. हे पाहून अनेकजण अचंबित झाले. अखेर काही जणांनी या कोंबडीला उपचारांसाठी पशुवैद्यकांकडे नेले. तेव्हा डॉक्टरांनादेखील काहीवेळासाठी धक्काच बसला. या कोंबडीच्या डोक्याच्या जागी रक्ताळलेला मांसाचा गोळा दिसत होता. तेव्हा डॉक्टरांनी मानेतील नलिकेतून या कोंबडीला खायला दिले. त्यानंतर तिला अँटिबायोटिक्स औषधेही देण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोंबडी या उपचारांना व्यवस्थितपणे प्रतिसादही देत आहे. हे पाहून डॉक्टरांनी ही कोंबडी खरी लढवय्यी (true warrior) असल्याचे म्हटले. एखाद्या प्राण्याच्या हल्ल्यात या कोंबडीची मान तुटली असावी, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
मात्र, मान नसूनही इतका काळ कोंबडीने जिवंत राहण्याची ही काही पहिली घटना नव्हे. यापूर्वी अमेरिकेतील उताह येथे माईक नावाची कोंबडी अशाचप्रकारे दीर्घकाळ जिवंत राहिली होती. माईक मान नसूनही तब्बल 18 महिने जगली होती.