रब ने बना दी जोड़ी! 3 फुटांचा नवरदेव अन् साडेतीन फुटांची नवरी; मंदिरात घेतल्या सप्तपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 15:52 IST2023-03-11T15:52:03+5:302023-03-11T15:52:34+5:30
तीन फुटी नवरदेवाने साडेतीन फुटी वधूशी लग्न केलं.

रब ने बना दी जोड़ी! 3 फुटांचा नवरदेव अन् साडेतीन फुटांची नवरी; मंदिरात घेतल्या सप्तपदी
लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. अशीच एक घटना आता बिहारच्या सारण जिल्ह्यात पाहायला मिळाली आहे. येथे तीन फुटी नवरदेवाने साडेतीन फुटी वधूशी लग्न केलं. जातीचं बंधन तोडून दोघांनी गडदेवी मंदिरात सप्तपदी घेऊन एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले आहे.
वधू-वरांनी लग्नानंतर कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. या लग्नात वधू-वरांच्या कुटुंबीयांसह त्यांचे मित्र आणि शेजारीही सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, चनचौरा येथील रामकोलवा गावात राहणाऱ्या 23 वर्षीय श्याम कुमारची उंची केवळ 3 फूट आहे. यामुळे त्यांचे लग्न होऊ शकत नव्हते.
मधुरा अनुमंडरच्या भावलपूर येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय रेणूची उंचीही साडेतीन फूट आहे. कमी उंचीमुळे तिलाही लग्न करता येत नव्हते. मात्र शैलेश सिंह नावाचा व्यक्ती या दोघांसाठी देवदूत बनून आला होता. मुलांचे लग्न होत नसल्याने दोन्ही कुटुंब चिंतेत असल्याचे समजताच शैलेशने दोन्ही कुटुंबांची एकमेकांशी ओळख करून दिली.
एकमेकांना भेटताच दोन्ही कुटुंबातील नाते घट्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी दोघांनीही गडदेवी मंदिरात कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे खूप खूश आहेत. श्याम कुमार 7 भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे. तर रेणू सहा भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. आता हा अनोखा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"