अजब नोकरी! 'लव्ह गुरू'चा शोध घेत आहे ही कंपनी, जाणून घ्या काय असेल काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:09 IST2025-01-31T16:09:10+5:302025-01-31T16:09:35+5:30
कंपनीनं “Chief Dating Officer” (CDO) पोस्टसाठी उमेदवाराचा शोध घेणं सुरू केलं आहे.

अजब नोकरी! 'लव्ह गुरू'चा शोध घेत आहे ही कंपनी, जाणून घ्या काय असेल काम!
प्रेमात असलेल्या किंवा ब्रेकअप झालेल्या तरूणांसाठी एक खास जॉब ऑफर समोर आली आहे. तुमच्याकडे जर डेटिंगचा अनुभव असेल तर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. बंगळुरूतील Topmate नावाच्या कंपनीनं एक अजब जॉब पोस्ट काढली आहे. सध्या या जॉब पोस्टची सगळीकडे चर्चा रंगली आहे. कंपनीनं “Chief Dating Officer” (CDO) पोस्टसाठी उमेदवाराचा शोध घेणं सुरू केलं आहे. ज्यांना डेटिंग समजतं आणि नात्यांची समज आहे त्यांना यासाठी निवडलं जाणार आहे. ही नोकरी ऑनलाइन डेटिंगची माहिती असणाऱ्यांसाठी आहे.
काय आहे या नोकरीत?
Topmate च्या मार्केटिंग लीड, निमिशा चांदा यांनी स्वत: या जॉब पोस्टबाबत पोस्ट शेअर करत लिहिलं की, "तुम्ही तुमच्या मित्रांना डेटिंगचा सल्ला देणारे पहिले व्यक्ती असता का? तुम्हाला ‘ghosting’, ‘breadcrumbing’, आणि डेटिंगचे वेगवेगळे शब्द समजतात का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही या जॉबसाठी परफेक्ट आहात". या जॉबसाठी काही मजेदार अटीही ठेवण्यात आल्या आहेत. जसे की, तुम्हाला कमीत कमी एक ब्रेकअप आणि तीन डेट्सचा अनुभव असावा. सोबतच तुम्हाला नवीन डेटिंग शब्दांची माहिती असावी. तसेच कमीत कमी दोन ते तीन डेटिंग अॅप्सचा तुम्ही वापर केलेला असावा.
डेटिंग अॅप कधी वापरलं का?
जर तुम्ही डेटिंग अॅप्स ट्राय केले असतील किंवा तुम्हाला डेटिंगच्या जगाचा अनुभव असेल तर हा जॉब तुमच्यासाठी आहे. Topmate ची इच्छा आहे की, जी कुणी व्यक्ती या पदावर काम करेल, त्यांनी डेटिंगचे नवीन शब्द आणि ट्रेण्ड समजावे व त्याबाबत दुसऱ्यांना सांगावं. याचा अर्थ हा नाही की, तुम्ही एक प्रोफेशनल डेटिंग एक्सपर्ट असावेत. फक्त तुमच्याकडे योग्य अनुभव आणि माहिती असावी.
कंपनीचा उद्देश्य
Topmate चा उद्देश केवळ डेटिंगबाबत मजेदार गोष्टी बोलणं हा नाही. कंपनीची इच्छा आहे की, ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीनं लोकांना डेटिंगबाबत समजावून सांगावं आणि त्यांच्या नात्यात मदत करावी. ही नोकरी सोशल मीडिया ट्रेण्ड, नवीन डेटिंग टर्म्स आणि ऑनलाइन नात्याशी संबंधित समस्यांवर काम करेल. आता जर कुणाला प्रेमात ब्रेकअप झाल्याची किंवा डेटिंगमध्ये काही समस्या असेल, तर CDO त्यांना एक योग्य रस्ता दाखवू शकतो.
जेव्हा ही पोस्ट व्हायरल झाली तेव्हा सोशल मीडिया यूजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी गमतीनं ते या पोस्टसाठी परफेक्ट असल्याचं म्हटलं. तर काहींनी हा नोकरी फालतू असल्याचं म्हटलं.