फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 17:28 IST2025-10-23T17:25:14+5:302025-10-23T17:28:23+5:30
जोडप्याला त्यांचा कार्यक्रम हॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये मोफत कौटुंबिक समारंभाची सुविधा दिली जाईल असंही उद्योगपती व्लादिस्लाव ग्रोचोव्स्की यांनी सांगितले आहे.

फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
जगातील बरेच देश त्यांच्या घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहेत. त्यासाठी नवनवीन शक्कल लढवत स्कीम जाहीर करत आहेत. इटलीसारखा देश त्यांच्याकडील गावात राहण्यासाठी लोकांना घरे आणि पैसे देत आहे. चीन, रशियासारखे देश प्रेग्नेंट महिलेला विशेष सुविधा पुरवत आहेत. त्यातच आता आणखी एक देश त्यांच्याकडील कमी होत चाललेल्या लोकसंख्येमुळे चिंताग्रस्त आहे. त्यामुळे या देशात जोडप्यांसाठी नवी ऑफर सुरू करण्यात आली आहे.
पोलंडमधील प्रसिद्ध उद्योगपती व्लादिस्लाव ग्रोचोव्स्की, जे देशातील सर्वात मोठ्या हॉटेल आणि प्रॉपर्टी कंपनीचे मालक आहेत. त्यांनी देशातील कमी होत असलेली लोकसंख्या पाहून एक पुढाकार घेतला आहे. जोडप्यांनी मुलं जन्माला घालावीत यादृष्टीने त्यांनी अनोखी ऑफर सुरू केली आहे. जे कुणी जोडपे Arche Group च्या २३ हॉटेलपैकी कुठेही थांबतील, त्या काळात महिला प्रेग्नेंट झाली तर त्यासाठी फ्री सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली जाईल. इतकेच नाही तर जर एखाद्या ग्राहक अथवा कंपनी स्टाफने त्यांची प्रॉपर्टी खरेदी केली आणि ५ वर्षाच्या आत मुल जन्माला घातले तर त्यांना १० हजार ज्लॉटी म्हणजे २ लाख रोख बोनस दिला जाईल असं जाहीर केले आहे.
त्याशिवाय हॉटेलमधील कुठल्याही जोडप्याच्या घरी मुल जन्माला आले तर त्याच्या नावावर एक वृक्ष लागवड केली जाईल. सोबतच पहिल्या मातृत्वाला या योजनेतंर्गत एक फ्री बेबी स्ट्रोलर आणि खास वेलकम पॅकेज दिले जाईल. आमच्या २३ आर्चे हॉटेल्सपैकी एका हॉटेलमध्ये राहून मुल झालेल्या कोणत्याही जोडप्याला त्यांचा कार्यक्रम हॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये मोफत कौटुंबिक समारंभाची सुविधा दिली जाईल असंही उद्योगपती व्लादिस्लाव ग्रोचोव्स्की यांनी सांगितले आहे.
जन्मदरात घट, पोलंडमध्ये नवं संकट
पोलंडमध्ये सध्या जन्मदरातील घट यामुळे नवं संकट ओढावले आहे. जगातील बरेच देश या समस्येला तोंड देत आहेत. २०२३ साली याठिकाणी प्रतिमहिला फक्त १.२ मुले जन्माला आली, २०२१ साली १.३३ आणि १९९० मध्ये हा दर २.०६ इतका होता. पोलंडप्रमाणे जपानही अडचणीचा सामना करत आहे. गेल्या ९ वर्षापासून जपानमध्ये लोकसंख्या घटत आहे. दक्षिण कोरियातही सर्वात कमी जन्मदर आहे. २०१८ ते २०२२ या काळात देशात फर्टिलिटी ट्रीटमेंट जवळपास ५० टक्क्यांनी वाढून २ लाखापर्यंत पोहचली आहे.