रेस्टॉरंटमध्ये स्तनपान केलं म्हणून महिलेला काढलं बाहेर, परिसरातील संतप्त महिलांनी शिकवला धडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 16:47 IST2021-09-21T16:17:18+5:302021-09-21T16:47:09+5:30
मालकानं लिहिलं, इथे न येण्याचा निर्णय़ घेतल्याबद्दल आभारी आहे. आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी इथे परत येऊ नका. हे माझं रेस्टॉरंट आहे त्यामुळे इथे माझेच नियम चालतील. रेस्टॉरंटमध्ये सभ्य लोकांप्रमाणे वागायला हवं. प्राण्यांप्रमाणे नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा असते. माझं रेस्टॉरंट स्तनपान करण्यासाठी बनलेलं नाही.

रेस्टॉरंटमध्ये स्तनपान केलं म्हणून महिलेला काढलं बाहेर, परिसरातील संतप्त महिलांनी शिकवला धडा
समस्त महिलावर्गाचा संताप अनावर होईल असं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेला तिच्या कुटुंबासह ती बाळाला रेस्टॉरंटमध्ये स्तनपान करत (Breastfeeding ) होती म्हणून बाहेर काढलं. मुख्य म्हणजे ही घटना घडली आहे अमेरिकेसारख्या देशात जिथे अशी संकुचित वृत्ती असेल अशी कोणी कल्पनाही नाही करु शकत.
अमेरिकेतील वॉशिंग्टन (Washington) येथील रुबी मीडेन (Ruby Meeden) आणि तिचा पती आरोन (Aaron) त्यांच्या नवजात बाळाला आपल्या कुटुंबियांना भेटवण्यासाठी घेऊन गेले होते. त्यासाठी त्यांनी आपले आवडते रेस्टॉरंट निवडले. दोघेही रेस्टॉरंटमध्ये बसून आपल्या कुटुंबीयांची वाट पाहत होते. तेव्हाच लहान बाळाला भूक लागली आणि ते रडू लागलं. यामुळे रुबीने भिंतीच्या बाजूला वळत मुलाला स्तनपान केलं (Breastfeeding in Restaurant ) . काहीच वेळात रेस्टॉरंटचा मालक त्यांच्याकडे आला. त्यानं या जोडप्याला रेस्टॉरंटमधून बाहेर जाण्यास सांगितलं. जेव्हा या जोडप्यानं याचं कारण विचारलं तेव्हा त्यानं काहीच न सांगता जोडप्याला धमकी दिली की पुन्हा रेस्टॉरंटमध्ये येऊ नका.
या दाम्प्त्याला या घटनेमुळे अतिशय दुःख झालं आणि त्यांनी ठरवलं की गूगलवर रेस्टॉरंटच्या रिव्ह्यू सेक्शनमध्ये जाऊन एक स्टार द्यायचा आणि आपली नाराजी व्यक्त करायची. आरोननं लिहिलं, की आम्हाला रेस्टॉरंटमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. आम्हाला काहीच कारणही सांगितलं गेलं नाही. त्यामुळे आता आम्ही पुन्हा याठिकाणी जाणार नाही. ही कमेंट पाहून यावर रेस्टॉरंटच्या मालकानंही उत्तर दिलं, जे वाचून सगळेच हैराण झाले.
मालकानं लिहिलं, इथे न येण्याचा निर्णय़ घेतल्याबद्दल आभारी आहे. आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी इथे परत येऊ नका. हे माझं रेस्टॉरंट आहे त्यामुळे इथे माझेच नियम चालतील. रेस्टॉरंटमध्ये सभ्य लोकांप्रमाणे वागायला हवं. प्राण्यांप्रमाणे नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा असते. माझं रेस्टॉरंट स्तनपान करण्यासाठी बनलेलं नाही.
आरोननं रेस्टॉरंटच्या मालकाचा हा रिप्लाय आपल्या परिसरातील फेसबुक ग्रुपवर शेअर केला. यानंतर अनेक महिलांनी संताप व्यक्त केला. महिलांनी रेस्टॉरंटबाहेरच आंदोलन केल्यानं मालकाला आपलं रेस्टॉरंट बंद करावं लागलं आणि सोशल मीडियावरुन आपलं अकाऊंटही त्यानं डिलीट केलं.