डिलिव्हरी बॉय एका झटक्यात बनला कोट्यधीश; आता २ कोटींच्या कारमधून फिरतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:40 IST2022-08-22T13:39:34+5:302022-08-22T13:40:33+5:30
अॅमेझॉन कंपनीचा एक डिलिव्हरी बॉयनं बरीच वर्ष मेहनत करुन जवळपास ६६ हजार रुपये साठवले. त्यानंतर त्यानं एक मोठी जोखीम पत्करली आणि सर्व पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवले.

डिलिव्हरी बॉय एका झटक्यात बनला कोट्यधीश; आता २ कोटींच्या कारमधून फिरतो!
नवी दिल्ली-
अॅमेझॉन कंपनीचा एक डिलिव्हरी बॉयनं बरीच वर्ष मेहनत करुन जवळपास ६६ हजार रुपये साठवले. त्यानंतर त्यानं एक मोठी जोखीम पत्करली आणि सर्व पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवले. आता वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी तो कोट्यधीश बनला आहे. या तरुणाचं नाव आहे कैफ भट्टी.
कैफ भट्टी ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये वास्तव्याला आहे. एकवेळ अशी होती की त्याला शाळेत शिक्षक इतर वर्गमित्रांसमोर त्याचा अपमान करायचे. त्याला नेहमी अपमानास्पद वागणूक द्यायचे. २०१७ साली युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कैफनं डिलिव्हरी बॉयचं काम करण्यास सुरुवात केली. दिवसाला जवळपास १४ तास तो काम करायचा. दिवसाचा बराच वेळ डिलिव्हरीचं काम करण्यात जायचा त्यामुळे कैफही निराश झाला होता. आपलं आयुष्य आता यातच संपणार आहे असं त्याला वाटू लागलं होतं. पण या निराशाजनक वातावरणाला कंटाळून त्यानं एकदा मोठी जोखीम पत्करण्याचं ठरवलं.
कैफनं त्याची सारी बजतीतून कमावलेली कमाई क्रिप्टोचरन्सीमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यानं Verge नावाच्या एका क्वाइनमध्ये जवळपास ६६ हजार रुपये गुंतवले होते. काही वर्षात या क्वाइनच्या किमतीत वेगानं वाढ झाली. त्यानं जवळपास २८ लाख रुपये यातून कमावले. त्यानंतर कैफनं नोकरी सोडली.
"इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे मी याआधी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप भारी अनुभव होता. मला आता माझ्या क्षमतेची कल्पना आली होती. पुढे जाऊन मी क्रिप्टोबाबत अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. आपण आणखी पैसे कमावले पाहिजेत असा निर्णय मी घेतला आणि त्यादृष्टीनं मी माझ्या मनाची तयारी केली", असं कैफनं सांगितलं. नशीबानंही कैफची साथ दिली आणि त्याचं इन्कम हळूहळू वाढू लागलं. नोकरी सोडल्यानंतर त्यानं तब्बल ५ कोटी रुपये कमावले आणि एका वर्षानंतर कमाई दुप्पट झाली.
कोट्यधीश झाल्यानंतर कैफ दुबईला शिफ्ट झाला. आता तो त्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. त्यानं दुबईत स्वत:साठी ४ कोटी रुपयांचं हक्काचं खर खरेदी केलं आहे. तर २ कोटी रुपयांची मर्सडिज जी वॅगन कार देखील खरेदी केली आहे.