गेल्याच महिन्यात बीकेसीतील रिक्षावाला व्हायरल झाला होता. अमेरिकन दुतावासाबाहेर लोकांच्या बॅगा सांभाळून तो महिन्याला ८ लाख रुपयांची कमाई करत होता. व्हायरल होताच आरटीओ तिथे पोहोचले आणि त्याच्याकडे रिक्षा चालवण्याचा परवाना आहे, साहित्य सांभाळायचा नाही असे सांगत त्याच्यावर कारवाई केली होती. आता अमेरिकेतून एक महिलेचा असाच बिझनेस व्हायरल झाला आहे.
अवघ्या २९ वर्षांची महिला सिडनी चार्लेटने कार सिटींगचा बिझनेस सुरु केला आहे. एखाद्याच्या कारमध्ये बसून सिडनी ही ६० ते ९० मिनिटांमध्ये ३५०० रुपये कमवत आहे. तुम्ही भलता सलता विचार करू नका. ती डेटिंग वगैरे असे काही करत नाहीय. तिची याच वर्षी फेब्रुवारीत मार्केटिंगची नोकरी गेली होती, यानंतर तिला ही कार सिटींगची आयडिया सुचली आहे.
नोकरी गेल्यानंतर ही महिला न्यूयॉर्कला आली. तिला घराचे भाडे भरायचे होते, घरचा खर्च भागवायचा होता. परंतू, नोकरी गेल्याने तिच्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते. तिला या विचारात असताना आयडिया सुचली आणि ती न्यूयॉर्कला पोहोचली. अमेरिकेच्या मोठ्या शहरांमध्ये कार कुठेही पार्क करण्याची मनाई आहे. तिथे जबर दंड आकारला जातो. तसेच रस्ता सफाईसाठी देखील एक नियम आहे. त्याला अल्टरनेट स्ट्रीट पार्किंग म्हणतात. भारतात जसे तारखेनुसार या बाजुला-त्या बाजुला पार्किंग केले जाते, अगदी तसेच.
यामुळे वाहन चालकांची मोठी अडचण होत असते. दर आठवड्याला कार मालकांना त्यांची कार एका बाजूहून दुसऱ्या बाजुला न्यावी लागते. कारण रस्ता साफ करायचा असतो. जर कार चालकाने तिथेच कार लावली तर त्यासाठी ४५०० रुपयांचा दंड भरावा लागतो. दंड तर घेतातच परंतू कारही टो करून नेली जाते. अशा भागात सिडनीने आपला बिझनेस सेट करण्यास सुरुवात केली आहे. एका भागात तिने असे २० क्लायंट मिळविले आहेत, जे हे सफाई वाहन येते तेव्हा त्यांची कारची चावी तिला देतात आणि आपला दंड वाचवितात. महिन्यातून चारवेळा ही महिला एका क्लाएंटचे हे काम करते. यासाठी तिला ६० ते ९० मिनिटे लागतात. याचे तिला तासाला ३५०० रुपये दिले जातात.
आता हा बिझनेस भारतात बीकेसीतील रिक्षा चालकाच्या मुळावर उठला तसा बेकायदेशीर पण नाहीय. कारण ती चुकीचे काहीच करत नाहीय. जे कार मालक आहेत, ते कामानिमित्त बाहेर गेलेले असतात किंवा कामानिमित्त आलेले असतात. कचरा साफ करणाऱ्या वाहनासाठी या लोकांना वाट पाहत थांबावे लागते. तो त्यांचा वेळही वाचला आहे. सिडनीच्या जिवावर आपली कार बिनधास्त सोडून या वेळात ते त्यांची कामे कोणतेही टेन्शन न ठेवता करत असतात. यामुळे दंड आणि तिला अदा करत असलेली रक्कम यात जास्त फरक नसला तरी ते तिला एवढे पैसे अदा करतात.