माकडचाळे! २ माकडांच्या भांडणाचा रेल्वेला फटका; एका केळ्याने स्टेशनवर कांड झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 08:38 IST2024-12-08T08:36:19+5:302024-12-08T08:38:05+5:30
समस्तीपूर जंक्शला फळे आणि इतर खाण्यापिण्याच्या गोष्टींमुळे इथं माकडांची संख्या अधिक असते. ही माकडे रेल्वे स्टेशनवर त्यांचे माकडचाळे करत असतात

माकडचाळे! २ माकडांच्या भांडणाचा रेल्वेला फटका; एका केळ्याने स्टेशनवर कांड झाला
समस्तीपूर - बिहारच्या समस्तीपूर जंक्शनवर शनिवारी एक अजब गजब घटना पाहायला मिळाली. याठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर ४ वर दोन माकडांमध्ये एका केळ्यावरून जोरदार भांडण झालं. एका माकडाने प्रवाशाकडून केळ हिसकावून घेतले, ते मिळवण्यासाठी दुसऱ्या माकडाने प्रयत्न केला होता. या एका केळ्यावरून दोन्ही माकडांमध्ये रेल्वे स्टेशनवर कडाक्याचे भांडण झाले. दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते. एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले होते.
या दोन माकडांच्या भांडणाकडे प्रवाशी टक लावून पाहत होते. या भांडणात एका माकडाने रागाने टोपली उचलली आणि दुसऱ्या माकडावर फेकली. ही टोपली चुकून रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडली. ओव्हरहेड वायरमध्ये विद्युत प्रवाह प्रचंड असल्याने त्यावर टोपली पकडताच शॉर्ट सर्किट झालं आणि एक ओव्हरहेड तार तुटून ट्रेनच्या डब्यावर पडली. स्टेशनवर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वीज पुरवठा बंद झाला आणि त्यामुळे ट्रेनची वाहतूक खोळंबली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या विद्युत विभागाची टीम तिथे पोहचली. तुटलेली तार दुरुस्त करण्यासाठी जवळपास १ तास गेला त्यानंतर ट्रेनची वाहतूक सुरळीत झाली.
माकडांच्या भांडणामुळे रेल्वेचा वेग मंदावला
समस्तीपूर येथील माकडांच्या भांडणामुळे रेल्वेचा वेग मंदावला. ओव्हर हेड वायर तुटल्याने बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेससह अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. समस्तीपूर येथे ओव्हर हेड वायर तुटली जी दुरुस्त करायला रेल्वेच्या टीमला १ तासाहून अधिक काळ गेला. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. दोन माकडांच्या भांडणामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, समस्तीपूर जंक्शला फळे आणि इतर खाण्यापिण्याच्या गोष्टींमुळे इथं माकडांची संख्या अधिक असते. ही माकडे रेल्वे स्टेशनवर त्यांचे माकडचाळे करत असतात. त्यामुळे प्रवाशीही माकडांच्या दहशतीत असतात. शनिवारी घडलेल्या या प्रकाराची रेल्वेने गंभीर दखल घेत तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर वन विभागाने इथल्या माकडांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु फारसं काही हाती न लागल्याने ते माघारी परतले.