पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 18:56 IST2025-10-25T18:54:30+5:302025-10-25T18:56:03+5:30
स्थानिकांनी तिच्याकडील दोन्ही पोती उघडून पाहिली तेव्हा त्यात १० आणि २० रूपयांच्या नोटांचा ढीग सापडला.

पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
उत्तराखंडच्या हरिद्वार येथील रुडकीमध्ये एका महिला भिकाऱ्याकडून नोटांचा प्रचंड साठा सापडला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकही हैराण झाले. या नोटा इतक्या मोठ्या संख्येने आहेत ज्या मोजायला एक दिवसही पुरला नाही.याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तिथे पोहचले. सध्या या भिकारी महिलेकडे पैशाचा साठा सापडल्याची बातमी परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
रुडकीतील मंगलोर येथील मोहल्ला पठाणपुरा येथील या महिला भिकाऱ्याकडे नोटांचा ढीग सापडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पठाणपुरा येथील एका व्यक्तीच्या घराबाहेर गेल्या १२ वर्षापासून ही महिला भीक मागत होती. ज्यावेळी या महिलेला तिथून हटवण्याचा प्रयत्न झाला. तिथे तिच्याकडे काही पोती आढळली. ही पोती उघडून पाहिली तेव्हा सर्वांचे डोळे वटारले. या भिकारी महिलेकडे २ पोती भरून नोटा आणि सिक्के आढळले. त्यानंतर लोकांना आणखी उत्सुकता निर्माण झाली.
स्थानिकांनी तिच्याकडील दोन्ही पोती उघडून पाहिली तेव्हा त्यात १० आणि २० रूपयांच्या नोटांचा ढीग सापडला. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात सिक्केही सापडले. हे सगळे पाहून स्थानिक हैराण झाले. ही महिला मागील १२ वर्षापासून एका घराबाहेर बसून भीक मागण्याचं काम करत होती. आज तिच्याकडे इतक्या प्रचंड प्रमाणात पैसा पाहून सगळेच अवाक् झाल्याचे स्थानिक रहिवासी इकराम अहमद यांनी सांगितले.
किती सापडले पैसे?
जेव्हा लोकांनी तिच्याजवळील दोन्ही पोती उघडून पाहिली. त्यातील नोटा मोजणी करण्यात आली. या नोटा मोजायला सकाळपासून संध्याकाळ झाली तरीही मोजणी पूर्ण झाली नव्हती. आतापर्यंत तिच्याजवळील १ लाख रूपयांच्या नोटा मोजण्यात आल्या. परंतु त्याहून अधिक ही रक्कम असल्याचा अंदाज येताच स्थानिकांनी पोलिसांना बोलावले. मात्र या संपूर्ण घटनेवरून परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.