७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:41 IST2025-12-05T12:40:24+5:302025-12-05T12:41:31+5:30
'मौनसेल हाऊस' या इस्टेटचे सातवे बॅरोनेट असलेले सर स्लेड हे गेल्या अनेक दशकांपासून वारसदार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.

७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...
संपत्ती, राजेशाही आणि वारसदाराचा हट्ट यावर आधारित एक धक्कादायक बातमी इंग्लंडमधून समोर आली आहे. आपल्या १३०० एकरच्या ऐतिहासिक मालमत्तेचा वारसदार मिळवण्यासाठी ७९ वर्षीय सर बेंजामिन स्लेड या ब्रिटीश बॅरोनेटने चक्क एका तरूण पत्नीचा जाहीर शोध सुरू केला आहे. ही केवळ लग्नाची ऑफर नसून, त्यासाठी त्यांनी वार्षिक £५०,००० (सुमारे ५९.३७ लाख रुपये) इतका आकर्षक पगार आणि राहण्याची सोय देण्याची घोषणा केली आहे.
'मौनसेल हाऊस' या इस्टेटचे सातवे बॅरोनेट असलेले सर स्लेड हे गेल्या अनेक दशकांपासून वारसदार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. वर्तमानपत्रातील जाहिराती, ऑनलाइन डेटिंग प्रोफाइल आणि टीव्हीवरील मुलाखतींद्वारे त्यांनी अनेक वेळा 'उत्तम प्रजनन क्षमता' असलेली पत्नी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष वारसदार हवा आहे.
विचित्र अटींची यादी
एवढे वय झाले तरी काही त्यांच्या अटी कमी होत नाहीएत. पत्नी शोधण्यासाठी सर स्लेड यांनी काही विचित्र अटींची यादीच तयार केली आहे. त्यांच्या मते, भावी पत्नी त्यांच्यापेक्षा साधारणपणे तीन ते चार दशके लहान असावी. महत्त्वाचे म्हणजे, 'स्कॉर्पिओ' राशीच्या, गार्डियन वृत्तपत्र वाचणाऱ्या आणि ज्या देशांच्या राष्ट्रध्वजात हिरवा रंग आहे, अशा महिलांनी अर्ज करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या महिलेकडे हेलिकॉप्टर उडवण्याचा परवाना किंवा कायद्याची पार्श्वभूमी असेल, त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांच्या अटींमध्ये आहे.
स्लेड यांनी वारसदार मिळवण्याच्या तयारीसाठी ९ महिन्यांचा फ्रोझन स्पर्मचा साठाही तयार ठेवला आहे. विशेष म्हणजे, ही इस्टेट १७७२ सालापासून त्यांच्या कुटुंबाकडे आहे, पण सध्या ते आर्थिक अडचणींचा सामना करत असून, ही ऐतिहासिक मालमत्ता एका आलिशान हॉटेल चेनला विकण्याच्या विचारात आहेत.