२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:00 IST2025-09-05T06:58:22+5:302025-09-05T07:00:06+5:30
आयको सांगतात, कोफू हा इतका उत्साही, सळसळत्या रक्ताचा, सभ्य आणि देखणा तरुण आहे की, कोणीही त्याच्या प्रेमात पडावं. मीही त्याच्या प्रेमात पडले यात काय विशेष?

२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
जपानमधला २३ वर्षांचा एक तरुण. अतिशय हुशार, देखणा. अनेक मुली त्याच्या प्रेमात आहेत; पण कोणाकडेही तो ढुंकूनही पाहत नाही. कोफू त्याचं नाव. नुकतंच त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. एका क्रिएटिव्ह डिझाइन कंपनीत तो इंटर्न आहे. कॉलेजमध्ये असताना त्याच्याभोवती मुलींचा कायम गराडा असायचा. त्यानं आपल्याकडे पाहावं, आपल्याला प्रपोज करावं, असं अनेक मुलींना वाटायचं. त्यामुळे त्या सारखं त्याच्या पुढे-पुढे करायचा; पण ‘मैत्रीण’ या नात्याशिवाय कोणत्याही तरुणीला त्यानं जास्त महत्त्व दिलं नाही.
एकदा असंच तो आपल्या एका मैत्रिणीच्या घरी गेला. मैत्रिणीच्या घरच्यांशी गप्पा मारत असताना अचानक ‘ती’ समोर आली आणि दोघंही एकमेकांकडे पाहतच राहिले. भानावर आल्यावर त्यांनी गप्पांना सुरुवात केली. पहिल्या भेटीतच दोघंही एकमेकांना आवडले होते. आँखों ही आँखों से प्यार हो गया...
आजवर इतक्या मुली कोफूच्या मागे होत्या; पण कोणालाच त्यानं भाव दिला नाही; मग ‘ती’ कोण होती, जिला पाहिल्याबरोबर त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या? तिचं नाव आयको आणि ती होती त्याच्या मैत्रिणीची आजी! वय वर्षे ८३! आजींचा दोन वेळा विवाह झाला आहे आणि त्यांना मुलगा, मुलगी आणि पाच नातवंडं आहेत. घटस्फोटानंतर त्या आपल्या मुलाच्या कुटुंबासोबत राहत होत्या.
प्रेमाला वय नसतं म्हणतात ते असं! पहिल्या भेटीतच आजीलाही कोफू खूपच आवडला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. २३ वर्षीय कोफूशी प्रेम जुळल्यावर आता त्या त्याच्यासोबत राहत आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांनीही पाठिंबाही दिला आहे. दोघांनीही अलीकडेच एका मुलाखतीत आपली प्रेमकहाणी उघड केली आणि सोशल मीडियावर ही लव्ह स्टोरी ओसंडून वाहते आहे. या दोघांनीही नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात कोफू प्रेमानं ८३ वर्षांच्या आयकोचा हात हातात धरून बसलेला दिसतो. आयकोचा आवाज अतिशय मधुर आहे. नखं रंगवलेली आहेत आणि तिच्या स्टाइलिश लहान केसांमध्ये तिच्या वयापेक्षा ती खूपच तरुण आणि देखणी दिसतेय.
आयको सांगतात, कोफू हा इतका उत्साही, सळसळत्या रक्ताचा, सभ्य आणि देखणा तरुण आहे की, कोणीही त्याच्या प्रेमात पडावं. मीही त्याच्या प्रेमात पडले यात काय विशेष? कोफूचं व्यक्तिमत्त्वच असं आहे की त्याला पाहताच मुली आपोआप त्याच्याकडे आकृष्ट होतात. आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप आहोत, त्यामुळेच पहिल्या भेटीतच आमचं प्रेम जुळलं आणि व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आम्ही एकमेकांना प्रपोज केलं! आयकोही दिसायला अतिशय सुंदर आहेत. त्या ८३ वर्षांच्या आजीबाई आहेत, असं कुणीच म्हणणार नाही, इतकं त्यांनी स्वत:ला मेन्टेन ठेवलं आहे. या वयातही त्या नुसत्या व्यायामच करीत नाहीत, तर निरोगी जीवनशैली पाळतात, स्टाइलिश कपडे घालतात. त्यांची हेअर स्टाइलही अशीच हटके आहे. शिवाय आवाज आणि बोलणं तर इतकं मधाळ, की ऐकतच राहावं. वयातील मोठ्या फरकामुळे दोघंही सुरुवातीला आपली भावना उघड करण्यास संकोचत होते. मात्र आयकोच्या नातीसोबत डिझ्नीलँडला गेले असताना तिथे त्यांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं आणि ही प्रेमकहाणी जगजाहीर झाली!