चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:19 IST2025-12-31T17:18:19+5:302025-12-31T17:19:05+5:30
जुन्या काळातही आजसारखे तंत्रज्ञान या रस्त्याच्या बांधकामात वापरण्यात आले होते. हा रस्ता ४० मीटर लांब आहे. काही ठिकाणी त्याची लांबी ६० मीटर इतकी आहे जे आजच्या चार पदरी रस्त्यासारखे आहे.

चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
चीनच्या पुरातत्व विभागाने अलीकडेच किन स्ट्रेट रोडचा एक हिस्सा शोधून काढला आहे. हा प्राचीन जगातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रकल्पांपैकी एक होता. चीनच्या उत्तर पश्चिमेकडे शानक्सी प्रांतात १३ किलोमीटर लांबीचा जवळपास २२०० वर्ष जुना हा रोड आहे. हा रस्ता प्रसिद्ध किन स्ट्रेट रोडचा एक भाग आहे. याला चीनचा सुपर हायवे आणि चीनचा पहिला नॅशनल हायवेही बोलले जाते.
या रस्त्याचे बांधकाम चीनचे पहिले सम्राट किन शी हुआंग यांच्या आदेशावर झाले होते. विशेष म्हणजे ९०० किलोमीटर लांबीचा हा रस्ता अवघ्या ५ वर्षात बनवून तयार झाला होता. त्याचा मुख्य हेतू राजधानीपासून सीमेपर्यंत सैन्य आणि शस्त्रे वेगाने घेऊन जाणे हा होता, जेणेकरून शत्रूंवर अधिक ताकदीने मुकाबला करता येईल. जुन्या काळातही आजसारखे तंत्रज्ञान या रस्त्याच्या बांधकामात वापरण्यात आले होते. हा रस्ता ४० मीटर लांब आहे. काही ठिकाणी त्याची लांबी ६० मीटर इतकी आहे जे आजच्या चार पदरी रस्त्यासारखे आहे.
डोंगर फोडून आणि दऱ्या कपाऱ्यातून हा रोड थेट बांधण्यात आला होता. मजबूतीसाठी रॅम्ड अर्थ तंत्राचा वापर केला होता, जमीन इतकी घट्ट बांधून ठेवली होती जी आजही खूप मजबुतीने उभी आहे. रस्त्याच्या शेजारी काही छोटे थांबेही पाहायला मिळाले. जिथे कदाचित सैनिक आराम करत होते अथवा साहित्य बदलायचे. याठिकाणी मातीच्या भांडीचे अवशेषही सापडले. ग्रेट वॉल ऑफ चायनानंतर हा चीनचा दुसरा सर्वात मोठा संरक्षण प्रकल्प होता. याला जगातील आधुनिक हायवेचा पूर्वजही म्हटलं जाते असं तज्ज्ञांनी सांगितले.
प्रसिद्ध इतिहासकार सिमा कियान यांनी त्यांच्या पुस्तकात या रस्त्याचा उल्लेख केला आहे आणि स्वत: यावर प्रवास केला. हा रस्ता सरळ ठेवण्यासाठी दऱ्या भरण्यात आल्या आहेत आणि डोंगर कापून समतोल राखला आहे. जेव्हा कालांतराने साम्राज्य कमकुवत झाले तेव्हा याच रस्त्याने शत्रू चीनमध्ये घुसखोरी करू लागले. त्याला रोखण्यासाठी चीनच्या राजांनी या रस्त्याचा काही भाग तीनदा स्वत:च नष्ट केला होता. या रस्त्याचा मोठा हिस्सा मु उस या वाळवंटाच्या रेतीत दबला गेला आहे. अलीकडे याठिकाणी झाडांची संख्या वाढली तेव्हा सॅटेलाईटच्या मदतीने याचा शोध लागला. हा तोच ऐतिहासिक स्ट्रेट रोड आहे याची पुष्टी पुरातत्व खात्याने केली.