मी १.१० ला जीव सोडणार, सगळ्यांनी या! कबर खणून, कफन घेऊन आजोबा बसले अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 13:25 IST2021-10-23T13:21:48+5:302021-10-23T13:25:20+5:30
१०९ वर्षांचे आजोबा मृत्यूची वाट पाहत होते; नातेवाईकांसह अख्खा गाव जमला

मी १.१० ला जीव सोडणार, सगळ्यांनी या! कबर खणून, कफन घेऊन आजोबा बसले अन् मग...
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बाराबांकी जिल्ह्यात काल (शुक्रवारी) एक विचित्र घटना घडली. दिवसरात्र अल्लाची प्रार्थना करणारे १०९ वर्षांचे मोहम्मद शफींनी अचानक त्यांच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना तातडीनं घर गाठायला सांगितलं. देवदूतासोबत आपला संवाद झाला असून १ वाजून १० मिनिटांनी माझा मृत्यू होईल, असा निरोप शफींनी पाठवला. त्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमली.
यानंतर मोहम्मह शफींनी कबर खोदायला सांगितली. त्यानंतर ते अंगावर कफन ओढून बसून राहिले. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून प्राण कसा निघून जातो, आत्मा शरीर कसं सोडून जाते, हे पाहण्यासाठी अनेकजण तिथे उपस्थित होते. कित्येक तास गर्दी कायम होती. पोलीस आणि प्रशासनाचे कर्मचारीदेखील हजर होते. जनभावना पाहून त्यांनी सुरुवातीला कोणतीही कार्यवाही केली नाही. मात्र कित्येक तास उलटल्यानंतरही मोहम्मद यांना काहीच झालं नाही. त्यानंतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मोहम्मद यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवलं.
सफदरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नूरगंज गावात हा प्रकार घडला. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी शफी यांचा मृत्यू होणार असल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानं गर्दी जमली. शफींनी त्यांच्या देखरेखीखाली कब्रस्तानात कबर खणून घेतली. त्यानंतर आंघोळ करून ते तासनतास मृत्यूची वाट पाहत बसले.
दुपारी प्राण सोडणार असल्याचा निरोप शफी यांनी सकाळीच नातेवाईकांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर नातेवाईक शफी यांच्या घराजवळ गोळा झाले. कफन अंगावर घेऊन ते मृत्यूची वाट पाहत बसले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र विश्वकर्मा, प्रभारी निरीक्षक सुधीर कुमार सिंह तिथे उपस्थित होते. बरेच तास उटलूनही शफी यांचे शब्द खरे ठरले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी शफी यांची समजूत काढत त्यांना घरी जाण्यास सांगितलं.